पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यंत्रघर माणूसघर करणं शक्य आहे

 कुटुंब म्हणजे केवळ चार भिंतीचं छप्पर नव्हे. नुसतं चार माणसांनी एकत्र राहण्याने कुटुंब आकारत नाही. पती-पत्नी यांनी केवळ प्रजननाच्या अनिवार ओढीनं केलेला तो घरोबा नसतो. कुटुंब ही एक सामाजिक गरज असते. तिच्याभोवती रक्तसंबंधांचं जाळं असतं. कुटुंब समाजाचा अविभाज्य घटक असतो. कुटुंबात राहणारी माणसं नातेसंबंधाच्या घट्ट विणीने कुणाची कोणीतरी झालेली असतात. कुटुंब वाढतं, फुलतं ते प्रेम, सहानुभूती, जिव्हाळा यांच्या उबदार मायेनं. तिथं अनौपचारिकतेची मऊ झालर असते. कुटुंब असते संस्कार केंद्र. ते व्यक्तिमत्त्व घडवण्याचं सहज विद्यापीठ असतं. इथं मूल्यं रुजवली जातात ती आचरणाचा वस्तुपाठ पुरवून. कुटुंब वळण लावतं. ते वारसा देतं नि जपतंही. रीती-भाती, परंपरा सारं समजावतं ते कुटुंब. इथले आई-बाबा केवळ जन्मदाते नसतात. ते जीवननियन्तेही असतात. भाऊबहीण म्हणजे केवळ लहान-मोठ्यांची श्रेणी नसते. ती असते जिवा-भावाची सोबत. कुटुंब केवळ सहजीवन नसतं. सहअस्तित्वाची जाण विकसित करणारा तो एक आश्वासक संवाद असतो. कुटुंब संगोपनशाळा असते. तिथं नात्यागोत्यांची तमाम मांदियाळी सतत काही ना काही निमित्ताने रुंजी घालत असते. पूर्वीच्या घरात तर हा सारा पसारा नित्य एकत्र नांदायचा.

 गेल्या शतकात यंत्रांनी माणसास घेरलं. गावाचं रूपान्तर शहरात झालं. घरं दुभंगली. शेतं विभागली. मोठी कुटुंब छोटी झाली. कुटुंबाचे आर्थिक आधार बदलले. पारंपरिक व्यवसाय जाऊन नोकरी, धंदे आले. नाही म्हणायला आर्थिक मान उंचावत गेलं. राहणीमान बदललं. पाटावर बसून जेवणारं कुटुंब डायनिंग टेबलावर आलं. घरात बाहेरच्या खोलीत टेलिफोन घणघणू लागला.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/७६