पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाचले. हे शास्त्र लक्षात घेऊन उत्सवाचा उर्वरित वेळ व पैसा सामाजिक उपक्रमांवरच खर्च व्हायला हवा. परिसरातील शाळांना मंडळांनी आपल्या निधीतून संगणक संच देऊन भावी पिढी संगणक साक्षर होईल असे पहायला हवे. अलीकडे सिनेमा, टी.व्ही. चॅनल्समुळे मुलांचे वाचन, चिंता करण्याइतके कमी झाले आहे. हे लक्षात घेऊन ग्रंथालयांना ग्रंथ भेट देणे, मंडळाच्या स्पर्धांची बक्षिसे पुस्तकरूपाने देणे असे नवे पायंडे पाडायला हवेत. उत्सवातील मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना, देखाव्याचे उद्घाटन अशासाठी पाहणे निवडताना कलाकार, साहित्यिक, शिक्षक, समाजसेवक, संशोधक, क्रीडापटू, विविध क्षेत्रातील मान्यवर यांची विचारपूर्वक योजना करावी, अशी निवड त्या व्यक्तींना समाजमान्यताच देत असते. यातून मूल्यांची जोपासना व मूल्यांचे महत्व वाढवता येईल. सदाचार, सचोटी, नैतिकता, समाजहितदक्षता वाढायची तर अशा व्यक्ती उत्सवातून सतत लोकांपुढे यायला हव्यात. केवळ धनदांडगे, पुढारी यांच्या स्तोमास फाटा देण्याची वेळ येऊन ठेपली आहे, हे विसरून चालणार नाही. गणेशमूर्ती बनवणारे, सजावट करणारे कामगार, कलाकार यांना बिदागी व नारळ दिला की आपण विसरून जातो. आपली ही वृत्तीही सामाजिकदृष्ट्या असहिष्णूपणाची आहे.
 ही काही उदाहरणे आहेत. तेच केलं पाहिजे असं नाही. पण मंडळांच्या कार्य व व्यवहाराची दिशा मात्र अशी असायला हवी. विचार करायला लागलो की अनेक उपाय, उपक्रम सुचतील. त्यासाठी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव आपण साजरा करायचा नाही असा हिय्या मंडळांनी करायला हवा. गणेशोत्सवातील हरवलेलं सामाजिक भान परत आणणं शक्य आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा नवनिर्वाचित राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला ‘विकसित' भारत बनवायचा तर उधळपट्टीऐवजी समाज उपयोगी खर्च व व्यवहाराचे धोरण अंगिकारायलाच हवे!

■■






एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/७५