पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्माण केलेलं मी डोळे भरून पाहिलंय. एका नाईट राउंडमध्ये काट्यांच्या कुशीत निश्चिंत झोपलेल्या गौरवनं मला यशोधरा नि सिद्धार्थची प्रचिती दिली नि मी बालकल्याण संकुल सोडून महानिर्वाणास निघालेल्या बुद्धाची फारकत, तटस्थता, व्यापक करुणा कवटाळायची ठरवली.
 १९९७ च्या डिसेंबरमध्ये मी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा जिल्हा प्रतिनिधी झालो नि क्रौर्याचं जग हेच माझं जीवन होऊन बसलं. पोलीस चौकी, न्यायालय, तुरुंग, शासन यातील रामायण, महाभारत टिपणारा मूक, तटस्थ निरीक्षक बनलो. प्रमुख आरोपी अंजनाबाई गावित यांचं १७ डिसेंबर १९९६ ला तपासकाळातच कारागृहात निधन झाल्यानंतर हादरलेली यंत्रणा मला आजही आठवते. नंतर तपासाचं केंद्र रेणुका नि सीमा झाल्या. किरण माफीचा साक्षीदार बनला. 'To set a thief, to catch a thief' चं तंत्र अवलंबिलं गेलं. कायदा एकीकडे दोषीस देहदंड सुनावतो व एका अपराध्यास निर्दोष सोडतो-कायद्याच्या तंत्रात विषम माणुसकी आपण रुजवत नाही ना? असा प्रश्न मला नेहमी बेचैन करतो. तिकडे पुराव्याअभावी एखादा अपराधी निर्दोष सुटल्याची बातमीपण मला इतकीच बेचैन करत असते! कसा समशील समाज घडणार? याबाबत आपण अधिक गंभीर, तार्किक, भावमुक्त होऊन निर्दोष समाजव्यवस्था, कायदा निर्माण करण्याकडे अधिक जागेपणी व जबाबदारीने सर्व पाहायला, पेलायला शिकलं पाहिजे, असं वाटतं!

 तो दिवस मला चांगला आठवतो. १८ नोव्हेंबर, १९९८. आरोपी रेणुका शिंदेनं मुलं आपल्या ताब्यात मिळावी म्हणून अन्नसत्याग्रह सुरू केलेला... यंत्रणा हतबल होती... कायद्याने, मानवी हक्क संरक्षणाचा भाग म्हणून अपराधी मातेसही मुलं बाळगण्याचा अधिकार आहे... बालक हक्कांच्या दृष्टीने आई-मुलाची फारकत गुन्हा आहे... तिकडे तुरुंगातील अपुरी जागा, अपु-या मनुष्यबळाच्या मर्यादा रोज नवा ताण निर्माण करताहेत... समाजरेटा लवकर निकाल मागतो आहे... सुनावणीत रोज नव्या अडचणी येत होत्या... जिल्हा सत्रन्यायाधीश, पीठासीन न्यायमूर्ती, तुरुंग अधिकारी, पोलीस अधिकारी अगदी आरोपींच्या वकिलांनी प्रयत्न करुनही अन्नसत्याग्रह बंद होईना... मानव अधिकारी म्हणून मला बोलावण्यात आलं... मी गौरवला घेऊनच हजर झालो. एव्हाना गौरव माझा झाला होता... समजाविल्याप्रमाणे आईला त्यानं सुनावलं- लाडिकपणेच... “तू जेव आधी... दादांनी सांगितलंय, तुझ्याशी तोवर कट्टी... रेणुकाने दुपारी चारला डोळे भिजवत खाल्लेली मसूरची उसळ नि भाकरी आजही माझ्या डोळ्यासमोर आहे नि नंतर खच्या सिद्धार्थ नि यशोधरेचं ते मनोमीलन... 'To set a thief, to catch a thief'-

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/७०