पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेव्हा जगण्यावरचा, जगवण्यावरचा माझा विश्वास वाढला. आम्ही महाराष्ट्रातल्या साच्या संस्थांतील मुलं-मुली पिंजून काढली पण पंकज, पिंकी, संतोष, क्रांती, श्रद्धा कोणीच हाती लागले नाही. या मुलांच्या शोधासाठी पोलिसांनी केलेली करुण धडपड मी जवळून पाहिली आहे. ती केवळ ते पोलीस अधिकारी होते म्हणून नव्हे, तर त्यांच्यातील अस्वस्थ, बेचैन माणुसकी मला नेहमीच साद घालत गेली. सुहास नाडगौडा जेव्हा, जिथे, जसे भेटतील तसे तपासाच्या ध्यासातच मी पाहिले.
 ३० जानेवारी, १९९७ ला राज्यातील सर्व खटले एकत्रितरीत्या चालवण्याचा निर्णय घेण्यात येऊन १ एप्रिलला आरोपपत्र दाखल करण्यात आलं. आरोपींना तपासासाठी, न्यायालयापुढे उभं करण्यासाठी पहिल्यांदा कोल्हापुरात आणलं तेव्हा मी आरोपींना पहिल्यांदा पाहिलं, भेटलो, बोललो... निमित्त होतं मुलांच्या शोधाचंच. मुलांचं वर्णन हवं होतं. खाणाखुणा, चेहरेपट्टी, रंग, सवयी... कानात मुलांच्या पालकांचा हंबरडा सतत घोंगावत असायचा... आरोपी बहुधा तटस्थ होते... निष्प्राण, अनपेक्षितरीत्या सर्वस्व गमावल्याचा आघात त्यांच्या रंध्रारंध्रातून झरत राहायचा...
 १९९७ चा मध्य असेल. न्यायालयाचं एक पत्र हाती आलं. आरोपी गावित- शिंदे यांनी आपली मुलं, जी नाशिकच्या रिमांड होममध्ये आहेत त्यांना नेहमी भेटता यावं म्हणून कोल्हापुरात रिमांड होममध्ये आणावीत... माननीय न्यायमूर्तीनी मुलांची जबाबदारी, संरक्षण, संगोपनाची हमी याबाबत नुसती कागदोपत्री विचारणाच नव्हती केली, संस्थेत भेट दिल्याचं आठवतं. आम्ही मात्र स्पष्ट केलं होतं की हे रिमांड होम असलं तरी मुलं खुली राहतील... त्यांचं हरवलेलं मातृत्व त्यांना मिळेल असं पाह... एक दिवस तुषार, आशिष, किशोर नि गौरव संस्थेत दाखल झाले...

 आम्ही सारे प्रचंड तणावाखाली होतो. बाहेरचा जनप्रक्षोभ, कायद्याचं भय नि माणुसकी, करुणेला तर तिलांजली नाही द्यायची... बालकल्याण संकुलाच्या सर्व कर्मचारी बांधवांनी एकमुखी या मुलांना आपलं मानलं, सांभाळलं... गौरव सर्वांत छोटा... आई हरवल्यानं बिथरलेला, दूधपिता गौरव घेतला की सोडायचा नाही... तासन्तास घ्यावं लागायचं मला... लिमलेटची गोळी, बिस्कीट, लाडू सारे दोन हवं असायचं. दोन्ही मुठी भरेपर्यंत चैन नसायची... माझ्यामागं सतत रुंजी घालणारा गौरव आमच्या चिमाजी काटे या काळजीवाहकांच्या खांद्यावर माझ्यासारखाच निजायचा. श्री.काटे आमचे सर्वांत कठोर काळजीवाहक. मुलांचा थरकाप व्हायचा त्यांच्या आवाजानं (कधी तरी माझाही!) पण गौरवने त्यांच्यात मातृत्व

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/६१