पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आयोगाचा प्रतिनिधी म्हणून काम करताना सतत मला क्रौर्य नि करुणेची ऊन-सावली अनुभवायला मिळाली. गेल्या वीस वर्षांच्या प्रवासात क्रौर्यापोटी फुटलेले लाख-लाख करुणेचे पाझर मी अनुभवलेत...
 बाहेर समाजात खून, मारामारी, चोरी, बलात्काराच्या क्रौर्याची कठोर प्रतिक्रिया उमटत असताना या सा-याचे बळी ठरलेल्या मूक, निरपराधांचे रोखलेले श्वास, दबलेली हृदये, कोमेजलेली मने, मरगळलेली शरीरे मी भोगत आलोय.. मी जवळून अनुभवलंय... कायदा आंधळा नसतो, डोळस नि पाणीदारही असतो. पोलीस निष्ठुर नसतात... त्यांचे पाय मातीचे असले तरी मनं मेणाचीच असतात. जेलरलाही भूतदयेची आपसुक झालर असते... देहदंडाची शिक्षा सुनावणारा न्यायाधीशही एखाद्या अपराध्याचे उपोषण सुटावं म्हणून तळमळत असतो.... जिल्हाधिकारीही एखाद्या अपराध्याचा खटला लवकर निकाली व्हावा म्हणून डी.ओ.लिहितो...... या साच्यामागे कायद्याची कठोर अंमलबजावणी करणा-या यंत्रणेतील माणसांची मनं करुणेने ओथंबलेलीच अनुभवली.... कठोर कर्तव्यात कसूर तर करायची नाही व करुणेचा पाझरही। आटू द्यायचा नाही अशी विलक्षण कसरत करणारी माणसं पडछाया म्हणून जगताना पाहिलीत. हे जग पडछायेमुळेच टिकून आहे अशी माझी श्रद्धा वाढते आहे...
 १९९२ ची गोष्ट. कोल्हापूरच्या परिसरात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलाने दुस-या अल्पवयीन मुलीचा निघृण खून केला. अपराधी मुलगा आमच्या संस्थेत होता. बाहेर समाजात या मुलाबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना आम्ही त्याला अत्यंत संयमाने सांभाळत होतो. अपराधी मुलगा आपलं निरपराधित्व सांगायचा-कायदा डोळस असला तरी ब-याचदा पुरावे अदृश्य, अमूर्त असतात... न्यायाची प्रक्रिया कितीही निर्दोष करायची म्हटली तरी ती सापेक्षच राहते ना! कायद्याच्या चौकटीत, तांत्रिक जंजाळात कधी कधी संवेदनक्षम सत्य गाडलं जातं हे अण्णा हजारेंच्या तुरुंगवासाने आपण अनुभवलंय! प्रश्न आहे तो निर्दोष, निर्वैर यंत्रणा, समाजमन घडवण्याचा. ती छोट्यामोठ्या न्यायालयीन निकालातून, लोकप्रतिक्रियांतून घडत राहते... सीतेच्या पावलासारखी तिची वाटचाल मंद असली, तरी पडछाया प्रकाश बनू शकेल...

 ही उमेद, हा विश्वास अलीकडच्या अनेक घटनांनी माझ्या मनात दृढमूल होतो आहे. जेलमध्ये टोळीयुद्धातील कैदी क्रुद्ध झाल्यानंतर हवालदिल यंत्रणा मी पाहिली आहे नि ईदच्या दिवशी जेल डोक्यावर घेणा-या कैद्यांना ‘ईद मुबारक' म्हणून मी शुभेच्छा दिल्या-दिल्या ते सारे कैदी ‘डिसिप्लिन' म्हणून शांत, करुण झालेले मी अनुभवलेत. 'जशास तसे', 'ठोशास ठोसा', 'काट्याने

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/६६