पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राक्षसी क्रौर्यामागची करुण पडछाया

 माझं जीवनच मुळी क्रौर्य नि करुणेची ऊन-सावली आहे. कुमारीमातेच्या पोटी जन्मलेला मी. जन्मदातीनं मला अव्हेरलं. ती परागंदा झाली, भूमिगत झाली ती कायमचीच. माझ्या जीवनातलं (नि कदाचित जन्मदातीच्याही!) ते अक्षम्य क्रौर्य होतं! मला जिथं टाकलं तिथल्याच एका कुमारीमातेनं मला कवटाळलं - पदरात पोलिओग्रस्त पोर असताना ! माझ्या जीवनातील (नि कदाचित त्या मानलेल्या मातेच्याही!) ती सर्वोच्च करुणा होती!! क्रौर्य नि करुणेच्या ऊन - सावलीचा खेळ समज येईल, वाढेल तसा मी अत्यंत संवेदनशीलपणे समजून घेत आलोय!
 लहानाचा मोठा झालो नि रिमांड होममध्ये आलो. अनाथाश्रमात अनाथ, निराधार होतो. रिमांड होममध्ये आजूबाजूला राहणारी, फिरणारी अधिकांश मुलं अपराधी होती. अपराधी क्रौर्यात माझं करुण कौमार्य विकसित झालं!
 मी तरुण झालो. तारुण्याचा वासंतिक गंध हुंगत असताना लक्षात आलं की या जगात अनाथ मुलींना सनाथ जीवनसाथी हवा असतो. माझं निष्पाप तारुण्य ठोकरल्याचं क्रौर्य अनुभवत असतानाच एका अनाथ तरुणीनेच मला जगण्याचा करुण पाझर पाजला नि मी सुखावलो!
 सज्ञान होत अजाणतेपणी मी क्रौर्य नि करुणेच्या जाळ्यात अडकत गेलो. अभिमन्यूसारखी माझी स्थिती झालीय! चक्रव्यूह भेदायला जायचा मार्ग गवसलाय... मुक्तीचा मार्ग मात्र गवसला नाही अजून...

 १९८0 मध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी मी जाणीवपूर्वक क्रौर्याला छेद देऊन करुणेची पडछाया प्रकाशित करायची ठरवून, रिमांड होमचं क्रौर्य दूर करण्याचा प्रयत्न करत आलोय. अगदी अलीकडे राष्ट्रीय मानवी हक्क

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/६५