पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपली ही विसंगती सक्रिय आहे. कामुकता व मोहाच्या मगरमिठीत जेरबंद झालेलं प्रेम जहरी झालं नाही तरच आश्चर्य? आपणास ‘पॉप' पाहिजे पण ‘पाप’ नको. असं होत नसतं. कोणताही नवा बदल नवं अरिष्ट घेऊन येतो. आपण घरात उपभोगाच्या वस्तू आणतो तितक्या संस्काराच्या आणतो का? संस्कार रुजवणाच्या सवयी, उपक्रमांची आपण किती जपणूक करतो? ‘भाषणं ऐकणं' पसंत करतो कां ‘भांगडा पाहणं'? आपल्या घरात 'मदर तेरेसा' असते की 'गॉड मदर' ? चर्चा महात्मा गांधींची असते की प्रियांका चोप्राची? घरी कुळथाचं पिठलं खाण्यापेक्षा बाहेर ‘पिझ्झा' खाणं नि 'पेप्सी' पिणं हेच आपलं ईप्सित झालंय ना? मग मुलांना पण वाटतं की आपली लारा, ऐश्वर्या, ऊर्मिला आपल्याला मिळालीच पाहिजे. किंबहुना, मुलांच्या या हिंस्त्र स्वप्नांचे आपणच नाही का सौदागर! लहानपणापासून आपल्या साध्या अपूर्ण इच्छांची लाडाद्वारे परिपूर्ती करताना आपणच त्यांना रोज आक्रमक केलंय! त्यांना 'नाही' हा शब्द व आचार, संस्कार आपण शिकवलाच नाही. पाच मागितले की पन्नास दिले. आता तो खंडणी वसूल करण्यास समर्थ झालाय! त्याला ‘नाही' माहीत नाही. नेपोलियनसारखा त्यांच्या जीवनकोशात 'Impossible' शब्द नाही. एकतर्फी प्रेमात तडफडणारी, होरपळणारी ही पिढी-त्यांच्या लेखी आपण दिलेलं जीवनपाथेय पहात असताना मला खलील जिब्रान आठवतो. तो म्हणाला होता, 'मला माहीत आहे.... मुलं तुमचीच आहेत... तुमच्याच हाडा-मासां, रक्तांनी ती आकारलीत... तुम्ही त्यांना तुमचं सर्व काही द्या... फक्त तुमची स्वप्नं नि विचार नका देऊ... कारण ती 'त्यांची' ती घेऊन आलेली असतात...' प्रेमाच्या बदलत्या संकल्पनेची शोकान्तिका आपण त्यांच्यात निर्माण केलेल्या विचार नि स्वप्नात आहे मित्रांनो!
 आता आपण एकदा आपणासच तपासून घेऊ या. नवे लिटमस तयार करू. रसायन नवं असेल, लक्ष्य मात्र तेच जुनं. 'जुनं ते सोनं'वालं गाव, घर असणारं प्रेम संबंधानं भरलेलं-भारलेलं, आजी असलेलं घर. तिला वृद्धाश्रमात पाठवण्याचा डाव असा अंगाशी येईल असं नव्हतं ना वाटलं! तेही इतक्या लवकर!! अजून उशीर झाला नाही. मुलांना आपलंसं करा, त्यांच्याशी बोला, हसा, खेळा. मुलं तुमचीच आहेत, नि तुम्ही मुलांचे!

■■




एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/६४