पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोगाची चीज नाही. ती भावनांची बंदिश आहे. तीत आदर भाव असतो. गुणगौरव, प्रशंसावृत्ती असते तिच्यामागे. सर्वांत महत्त्वाची म्हणजे त्याग भावना, समर्पणाइतकीच जाज्वल्य. मनुष्याप्रेमात सामर्थ्य असतं तसा विश्वासही. ‘प्रियाराधन' म्हणजे प्रेमासाधनाच. पूर्वी ती पुरुष करायचे. आता ती उभयपक्षी केली जाते. एकमेकांस मोहक दिसण्याची धडपड नि मोहित करण्याची ईष्र्या. प्रियाराधनात पूर्वी निखळपणा होता. आता त्याची जागा एकाधिकार, हक्क यांनी घेतलीय. तीत दुस-या बाजूच्या मुलीच्या इच्छा, भावना, होकारनकार, जाण-निष्पापता असा कसलाही विचार न करता एकतर्फी मागणी नि एकतर्फी पाठपुरावा नि पूर्ती. नकार नाहीच. पशू, शत्रूसारखी अमानुष जीवघेणी स्पर्धा. निखळ संबंधांचे मतलबी अर्थग्रहण. पुरुषी अहंकाराचा जहरी फुत्कार! प्रेमाच्या उदात्त मनुष्यगौरवी परंपरेस हरताळ फासणारा व्यवहार.

 कधी काळी त्याग, आदर, संयम, समर्पण, सद्भाव, सौहार्द घेऊन जन्माला येणारं प्रेम आज शरीरी, उत्तान, भोगलोलुप, अधिकारी, जबरी, बलात्कारी, बिभत्स कां व्हावं? थॉमस कॅपिस उत्कट प्रेमाचं वर्णन करताना किती भावविभोर होऊन गेला होता. म्हणाला होता. "Nothing is sweeter than Love, nothing more courageous nothing higher heaven and Earth' प्रेम म्हणजे सुखाचा सागर! अशा या उत्कट प्रेम प्रकटीकरणास ओंगळ रूप का यावं? मला वाटतं, त्याला कारणं आहेत. एक म्हणजे घर. पूर्वी त्यात घरपण होतं, आज अपार्टमेंटपण आलंय. पूर्वीच घर माजघर, स्वयंपाकघर, अंगण, परस इत्यादींनी पूर्ण होतं. त्यात उबारा होता, थंडपणा नि सुरक्षाही! दिंडी दरवाजांनी, साखळदंडांनी! आजी, काका, मामा, मावशी, चुलतभाऊ, मामेबहीण, नात, सून, भावजय नात्यांच्या किती पदरांनी मनुष्य सुखावायचा, सुरक्षित असायचा. भविष्य, चिन्ता नावाचा प्रकार नव्हताच मुळी. समाज म्हणाल तर ते एक मोठं घर' होतं. ब्राह्मण आळी, जैन गल्ली, अकबर मोहल्ला, चर्च लेन, वैकुंठभूमी, कबरस्तान, मंदिर-मस्जिदनी पसरलेला गाव एक होता. गावातच साच्या गरजा भागायच्या. सारी भावकी पंचक्रोशीतच पसरलेली असायची. सांगावा गेला की पाणी तापेपर्यंत सारी बिरादरी जमा व्हायची. पदर कुठून ना कुठून लागायचा. एकमेकाला हात मिळायचा. यंत्र, शहर, सुधारणा, गतीने सारी रया गेली. शिक्षणाने माहिती दिली. ज्ञान व शहाणपण नाही दिलं. स्वातंत्र्याने समृद्धी दिली, स्वराज्याचं सुराज्य करण्याची अक्कल नाही दिली. तार, टेलिफोन, रेल्वे, विमान, जहाज, संगणक, इंटरनेट, सिनेमाने जीवनाची भौतिकता उंचावली आणि भपकाही वाढवला. मानवी संबंधातील सौहार्द, सद्भाव, सामंजस्य, संयम इत्यादी नंदादीपाप्रमाणे

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/६१