पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्याकडचा आदर्श नि अनुकरणीय नमुना. याच काळात धर्मसत्ता प्रमुख असलेल्या राष्ट्रांत, विशेषतः युरोपात ‘रोमॅन्टिक' प्रेमाचा उदय झाला. पुढे आपल्याकडेही त्याचे अनुकरण झालं. धर्मातील 'ब्रह्मचर्य' कल्पनेमुळे चोरट्या प्रेमाचे प्रकार वाढले. त्यातून मनुष्याची विसंगती वाढली. 'वरून कीर्तन नि आतून तमाशा' सारख्या व्यवहारांमुळे लिंगव्यवहाराचं उदात्तीकृत रूप म्हणून कथाकाव्यात काल्पनिक प्रेमाचा विकास झाला. काव्यातील प्रेमात दमनामुळे उत्तानपणा येऊन त्याची रसभरीत वर्णने वाचकांना भुलवू लागली. त्यातून उच्चकुलीन, सुंदर प्रेयसीस धाडसाने प्राप्त करण्याची प्रवृत्ती उदयास आली. अलीकडच्या काळातील एकतर्फी प्रेम ही वेगळ्या संदर्भ व परिस्थितीत झालेली इतिहासाची पुनरावृत्तीच वाटते. प्रेमाच्या बदलत्या संकल्पनेचा तो मला ठळक पुरावाही वाटतो.
 प्रेम एक मनोधर्म होय.ती एक भावना आहे. विविध भावबंधांनी गुंफलेला तो एक भावविशेष होय. त्याची व्याप्ती मोठी. ‘उदात्त वृत्तीचा प्रसर । स्वार्थाचा पाडी विसर।।' असं ते व्यापक, दिव्य प्रेमात स्वार्थ, अभिलाषा यांना थारा नसतो. त्याचं रूप गूढ. 'प्रेम न ये सांगता, बोलता, दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ।।' त्याची प्रचिती येते, पण ते काय आहे ते सांगता येत नाही. तुकारामांप्रमाणे कबीरांनी पण प्रेमास ‘गूंगे का गूड़' म्हटलंय. मुक्या माणसास गुळाची चव कळते पण वर्णन नाही करता येत. तसं प्रेमाचं असतं. ईश्वराप्रमाणेच ते ‘अनिर्वचनीय' असतं. दर्शन, स्पर्श, श्रवण, संवाद साच्यासाठी आसुसलेलं! शरीराची तितकीच मनाची तगमग करणारं!! ते ‘ब्रह्मस्वरूप' ही असतं नि ‘जहर'ही। (इष्काचा जहरी प्याला...) ते ‘सकाम'ही असतं आणि ‘निष्काम'ही. ‘भेटी लागे जीवा' असं आकर्षण असतं त्यात, भौतिक नि आध्यात्मिक पण. आपली सारी सृष्टी प्रेममय म्हणून मनुष्य जीवनही! पर्वत पुल्लिंगी, नदी स्त्रीलिंगी. चंद्र, सूर्य, तारे पुल्लिंगी. चंद्र स्त्रीचा पहिला पती, त्याला पाहिलं की स्त्रियांना मासिकस्त्राव सुरू होण्याची कल्पना-धारणा. सूर्यापासून कुंतीचं गर्भवती होणं. सृष्टी व मानवाच्या प्रेमसंबंधांचा इतिहास जसा रोचक तसा देव-दानव संबंधांचाही. सारं मानवी जीवन प्रेममय असतं. होतंही आणि आहेसुद्धा!

 ते सदासर्वकाळ प्रेममय असतं. प्राणीवर्गात ‘माज' वार्षिक असतो. तो ठरावीक काळ असतो त्यांचा. माणूस सर्वकाळ कामुक, फक्त प्रकटीकरण प्रभावाने- दर्शन, स्पर्श, संवाद, श्रवण, संबंध, भाव, क्रीडा, लज्जा, रतिभावना इत्यादींनी प्राण्यापेक्षा मनुष्यप्रेम वेगळं असतं. ते त्याला लाभलेला भाव, भावना, बुद्धी, विचारांच्या वरदानामुळे. मनुष्य प्रेम म्हणजे केवळ शरीर

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/६१