पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रेमाची बदलती संकल्पना



 मनुष्य जीवनातील विविध संबंधांचा मूळ आधार प्रेम आहे. प्रेमाची अनेक रूपं मानवी जीवनव्यवहारात दिसून येतात. या वैविध्यानेच मनुष्य जीवन, परस्परांचे संबंध सुखावह नि सुसह्य होत असतात. प्रेमामुळे मनुष्य जीवन व मानवी संबंध आनंदी होतात. जीवन रसमय करणा-या प्रेमाची अनेक रूपं, स्थित्यंतरं अनुभवायला येतात. ‘प्रेमानंद', ‘ब्रह्मानंद', ‘एकमेवाद्वितीयम्' अशा सतत उच्च रूपं धारण करणाच्या प्रेम स्वरूपांमुळे त्याचं लौकिक-अलौकिक, शारीरिक, भावनिक, कामुक, आध्यात्मिक असं अनेकस्तरीय स्वरूप लक्षात येतं. प्रेम ही संमिश्र भावना आहे. त्यात स्वीकार्य गोष्टी जशा असतात तशा त्याज्यही. प्रेम संकल्पनेविषयी जेव्हा मानवी जीवनसंबंधाने आपण विचार करतो तेव्हा प्रेमाचे आदर्श, अनुकरणीय, समाजहितैषी रूपच आपणास अभिप्रेत असतं. मनुष्य आणि प्राण्यांच्या प्रेमातील हाच मूळ फरक आहे. प्राण्यांच्यातील प्रेम हे सतत शारीरिक असतं. मनुष्य प्रेमास शरीरापलीकडे भाव, संबंध, नैतिकता, बौद्धिकता अशा अनेक कडा असतात. मनुष्य प्रेम केवळ वैषयिक असूच शकत नाही. तो असतो भावोद्गार!

 अकराव्या शतकापासून जवळपास सोळाव्या शतकापर्यंत मनुष्य प्रेमाचं रूप आजच्या भोगलोलुप स्वरूपापेक्षा अधिक उदात्त होतं. मध्ययुगीन प्रेमाची उभारणीच मुळी दुर्बल व उपेक्षितांच्या रक्षणार्थ होती. शिव्हरी' (chivalry) स्वरूपाचं प्रेम, सामर्थ्यावर उभं असलं, तरी त्यात स्त्रीदाक्षिण्य, दुर्बलांप्रती दया असायची. या प्रेमाच्या जोरावरच राजपूत व मराठे मोठे झाले. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा शिवाजीने केलेला सन्मान व रक्षण ‘शिव्हरी' प्रेमाचाच

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/६०