पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

श्रमातून मोक्ष मिळतो हे समजाविले. आजच्या कार्य संस्कृतीविषयक जागरूकतेत वेबरच्या या कल्पनेचा फार मोठा वाटा आहे. त्याच्या प्रयत्नातून ‘कार्यनीती' (work ethic) ची निर्मिती झाली. यातून कार्यविषयक आदर्श तत्वज्ञानाचा उगम झाला. काम मनापासून करायला हवे. ते स्वहितार्थ असते तसे लोकहितार्थही. कामामागे निर्मितीमूल्य असते. निर्मिती ही समृद्धीची जननी होय अशी कार्यनीतीची शिकवण आहे. कार्यनीती ही कामाच्या तात्त्विक अंगाचा विचार करते. तिचे दृष्य स्वरूप म्हणजे कार्यसंस्कृती होय. कार्यसंस्कृती कामाचा आनंद समजाविणारा आचारधर्म होय. या नव्या संस्कृतीमागे श्रमाला प्रतिष्ठा देण्याची जशी धडपड आहे तशीच माणसाला माणूस म्हणून समजून घ्यायचीपण. मनुष्य म्हणजे यंत्र नव्हे. तंत्रात तो निष्क्रिय व निर्जीव होता नये. त्याला भावना, मन, विचार आहेत. त्याचा उपयोग त्याच्या मनाची उमेद वाढविण्याच्या दृष्टीने झाला तर तो अधिक निर्मितीक्षम, कार्यक्षम होतो. त्याकडे तसे पाहिले, त्याला तसे प्रशिक्षित केले तर तो विधायक, उत्पादक व सकारात्मक व्यक्ती ठरतो हे कार्यसंस्कृती समजाविते.

 कार्यसंस्कृतीच्या संदर्भात दोन मतप्रवाह आहेत- १) पौर्वात्य २) पाश्चात्त्य, पौर्वात्य कार्यसंस्कृती अध्यात्मावर उभी आहे, ती कामास निष्काम मानते. त्यामुळे इथे कामास आपसूकच मर्यादा पडतात व कामापासूनचा आनंदही यथातथाच मिळतो. त्यामुळे इथे श्रमसंस्कृती फोफावली नाही. जपान, थायलंड, चीनसारखे पौर्वात्य देश मात्र याला अपवाद आहेत. बौद्ध श्रमणांनी त्यांना श्रमसाधना दिली. आपल्याकडे राहिले भिक्खू. त्यांनी मागायचा संस्कार रुजवला. हिंदू धर्मातही थोड्याफार फरकाने ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी' विचाराने आळसवादच जोपासला. पाश्चात्त्य कार्यसंस्कृती याच्या एकदम उलट होय. ती कामाकडे भौतिकवादी दृष्टीने पहायला शिकवते. पाश्चात्त्य कामास ‘सकाम' मानतात. कामापासून फळ मिळायलाच हवे असा त्यांच्या आग्रह असतो. पण त्यासाठी ते अंग मोडून कामही करतात. कामातील उत्पादक व निर्मितीमूल्यांचे मापन त्यांना मान्य आहे. ते स्वतःच मनाने ते स्वीकारत असल्याने तेथील कामावर मुकादम, पर्यवेक्षक शिवाय फाईल उचलायला शिपाई लागत नाही. कामाचा सोस त्यांना हव्यासाकडे घेऊन गेला. कामातून आलेल्या भौतिक समृद्धीने त्यांना चंगळवादी बनवले. आज भारतापुढे कार्यसंस्कृतीचे उभे असलेले आव्हान हे वरील दोन्ही कार्यसंस्कृतीतील दोष दूर करून नव्या संस्कृतीनिर्मितीचे व ते अंगीकारण्याचे आहे. एक अब्ज़ मनुष्यबळाचा आपला देश, शिवाय निसर्गाचे वरदान! जर आपण कामाबद्दल श्रद्धा, प्रेम, आकर्षण, तन्मयता, समर्पण निर्माण करू

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/५६