पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देश' अशी आपली गणना झाल्याशिवाय रहाणार नाही. सद्यःस्थितीच्या विदारक चित्रास गेल्या पन्नास वर्षातील आपले बेजबाबदार कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक पर्यावरण जसे जबाबदार आहे तसे मनुष्य घडणीत राहिलेला आत्मसंवाद, आत्मपरीक्षणाचा अभाव हेही प्रमुख कारण होय. यासाठी येथील समाजमन आता कार्यसंस्कृत होण्याची गरज निर्माण झाली आहे.
 मनुष्य कार्यसंस्कृत होतो तो कार्याच्या जाणीवेने. अंगीकृत केलेले कोणतेही कार्य साध्य करण्याची आपली कृती म्हणजे कार्य. त्याला व्यवहारी भाषेत कामही म्हणतात. आपणाला आजवर असेच शिकविण्यात आले आहे की नोकरी अथवा व्यवसाय करायचा तो मोबदला अथवा मिळकतीसाठी. तसे शिकवले गेले यात गैर काहीच नाही. आपणास हा देश काही ‘तुकारामाचे दुकान' नाही बनवायचा. पण हे काम आत्मिक समाधानासाठी करायचे असते हे शिकविले न गेल्यामुळे आपण त्रयस्थ व तटस्थपणे काम करत रहातो. परिणामी त्या कामाच्या समाधानास आपण मुकतो. खलील जिब्रानने श्रमास प्रेमसाधना म्हटले आहे. त्याच्या दृष्टीने श्रम म्हणजे प्रेमाचे मूर्त स्वरूप. श्रद्धेने काम केल्याने गरीबी, आळस व व्यसनाधीनतेतून मुक्ती होते म्हणतात. या त्रिदोषांचे येथील लक्षणीय अस्तित्व काय सांगते? कामातून मनुष्य समाजाचा घटक बनत असतो. कामामुळेच आपल्या जीवनास पूर्णत्व येत असते असे आपणास कळते, पण वळत नाही अशी स्थिती आहे. भारतीय समाजमनाच्या उभारणीचा भक्कम आधार आहे धर्म. आपल्या सर्व धर्मात कामास ‘निष्काम' मानण्यात आले आहे. म्हणजे मोबदल्याच्या अपेक्षेविना ते करायची शिकवण भगवद्गीता देते. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलषु कदाचन' चा मंत्र प्रत्येक भारतीय हजारदा पुटपुटतो, पण त्याचा अंगीकारशून्य व्यवहार रोज गीतेचा पराभव करताना दिसतो. इस्लाम धर्मात व्याज, लॉटरी, जुगार निषिद्ध मानण्यात आला आहे तो ते श्रमहीन, अकष्ट असल्यामुळेच. संत बहिणाबाईने तर ‘ज्याचे हातले घटे, त्यालेच देव भेटे' म्हणून श्रमप्रतिष्ठेचीच महती गायली आहे. आपणा भारतीयात एक विसंगती मोठी आहे की आपण विचाराने मोहित होतो पण कार्यप्रवण होत नाही. ही निष्क्रियता, कामातील निरुत्साह, मरगळच आपल्या साच्या शोकांतिकेचे गमक वाटते.

 जगातील सर्वच धर्मात पूर्वी श्रद्धेने मोक्ष मिळतो असे शिकविण्यात आले आहे. धर्मातील कर्मकांड हेच शिकविते. या धारणेस छेद देण्याचा विचारपूर्वक प्रयत्न मॅक्स वेबर(१८६४-१९२०) ने केला. जर्मन समाज व अर्थशास्त्री असलेल्या वेबरने ‘प्रोटेस्टंट वर्क एथिक' ची कल्पना मांडून

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/५५