पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कुटुंबातील एक तरी मुलगा-मुलगी अमेरिकादी देशात स्थायिक झालेली आढळते. पूर्वीच्या ‘दुबई स्वप्नाची' जागा आता ‘अमेरिकी स्वप्नांनी' घेतली आहे.
 मला असा प्रश्न पडतो की भारतीय माणूस अमेरिकेत कार्यकुशल ठरतो पण तो भारतात मात्र कुचकामी कसा? भारतातला नागरिक विदेशी गेला की एकदम जबाबदार, कार्यतत्पर, शिस्तप्रिय, वक्तशीर कसा होतो? वारंवार येणाच्या अनिवासी भारतीयांशी या फरकाबद्दल चर्चा करताना आपल्यातील बदलाचे श्रेय ते तेथील कार्यसंस्कृतीस देताना दिसतात. तेथील कार्यसंस्कृती ही जबाबदार सामाजिक, राजकीय, आर्थिक पर्यावरणातून विकसित झाली असल्याचं दिसून येतं नि लक्षात येतं भारतापुढील कार्यसंस्कृतीचं आव्हान!

 जगाच्या नव्या कार्यप्रवण व उत्तरदायी (Accountable) व्यवस्थापनतंत्रापुढे आपला टिकाव लागायचा तर आपण अंतर्मुख व्हायला हवं! आपल्याकडे कष्टाच्या, अंगमेहनतीच्या कामास तुच्छ लेखलं जातं. थोडा शिकला की माणसाची कष्टाशी फारकत झाली हे ठरलेलं. प्रत्येकास हवी असते सरकारी नोकरी, ती देशसेवेसाठी नाही. या सेवेचा अर्थच लोप पावलाय. ‘जनसेवार्थ' ब्रीद असलेल्या या सेवेच्या प्रत्येक टपालाच्या लिफाफ्यावरचा ‘भारत सरकार सेवार्थ' (On Indian Government Service (O.I.GS.) शिक्का आता आपल्या कपाळी गोंदणासारखा कोरला गेलाय. सरकारी नोकरी म्हणजे कामाच्या जबाबदारीचं सामाजिक लेखापरीक्षणमुक्त ठिकाण. सुट्ट्यांची रेलचेल. रजांची चैनी. कामाच्या वेळात काम केलंच पाहिजे, जागेवर असलंच पाहिजे असे बंधन नाही. ठरावीक काळानं घसघशीत वेतनवाढ ठरलेली. दफ्तर दिरंगाईचा जन्मसिद्ध हक्क असलेलं अढळपद! सर्वांत गंभीर म्हणजे स्वतः नि इतरांबद्दल असलेली कमालीची बेफिकिरी! हे चित्र केवळ सरकारी कार्यालयातच असते असे नाही. थोड्याफार फरकाने ते निमशासकीय सार्वजनिक संस्था, संघटना व खाजगी क्षेत्रातही दिसतं. भारतीय कार्यसंस्कृतीनं आपणास काम कसे करायचे (खरे तर कसे न करायचे वा टाळायचे!) शिकवले. पण काम का करायचे हे न शिकवल्यामुळे आपल्या कार्यसंस्कृतीत ढोबळ पण मूलभूत स्वरूपाचा दोष राहून गेला आहे. तो दूर करण्यासाठी कार्य म्हणजे काय? ते का करायचे? कसे करायचे? किती करायचे? केव्हा करायचे? कुठे करायचे? या प्रश्नांचे सकारात्मक प्रशिक्षण व संस्कार येथील समग्र जनतेस देण्याचे आव्हान जगभरच्या नव्या व्यवस्थापनाने उभे केले आहे. आपण वेळीच जागे नाही झालो, भानावर नाही आलो तर आणखी काही वर्षांनी ‘जगातील सर्वाधिक निरुपयोगी मनुष्यबळ असलेला

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/५४