पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भारतापुढील कार्यसंस्कृतीचे आव्हान



 संपर्क साधनांच्या विकासामुळे जग जवळ आलं आहे. तसेच ते मतीवान नि गतिमानही झालय. नित्य नव्या क्षेत्रातील माणसाच्या मुशाफिरीने जीवनाचा चेहरामोहराच बदलतोय. खाणं-पिणं, पोषाख, व्यवहार, शिष्टाचार, चालीरीती यामध्ये पूर्वी असलेली देशानुगणिक भिन्नता लोप पावत चाललीय. त्याची जागा वैश्विक संस्कृती घेत आहे. जगभर एकसारखे पोषाख, भाषा, शिष्टाचार, कार्यपद्धती रूढ होऊ पाहाते आहे. त्याचाच एक भाग म्हणून जगभर एक समान अशी कार्यपद्धती, कार्यकुशलता रूढ होऊ पाहते आहे. संगणकीय व्यवस्थापन तर भाषा व तंत्राच्या समानतेवरच उभं आहे, शिवाय ते तसं विकसितही होतय! त्यामुळे जगभर तत्पर व कर्तव्यपरायण कार्यसंस्कृती विकसित झालीय. या नव्या व्यवस्थापनशास्त्रानं कार्यकुशल मनुष्यबळाकडे एका नव्या दृष्टिकोनाने पाहायला सुरू केलंय.

 पूर्वी भारत हा अंगमेहनतीचे कार्य करणारे स्वस्त मनुष्यबळ देणारा, पुरविणारा देश होता. पारतंत्र्याच्या काळात मॉरिशस, त्रिनिदाद, टोबॅगो, सूरीनाम, फिजीसारख्या देशात उसाची शेती करायला म्हणून मोठ्या प्रमाणात भारतीय मनुष्यबळाची सक्तीने निर्यात झाली. स्वातंत्र्यानंतरच्या पंचवीसतीस वर्षानंतर-१९७५ नंतर मोठ्या प्रमाणात दुबई, बहारीन, कुवेत, अरब आमिरातीसारख्या देशात कुशल, मनुष्यबळ- सुतार, गवंडी, प्लंबर, नर्स यांची स्वेच्छानिर्यात आर्थिक आकर्षणाने झाली. गेल्या दहा वर्षांत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात बुद्धिजीवी मनुष्यबळाच्या वाढत्या मागणीने अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासारख्या देशात उच्चशिक्षित मनुष्यबळाची, स्वयंचलित निर्यात झाली. आज आपल्याकडे उच्चशिक्षित दहा मध्यमवर्गीय

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/५३