पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपले प्रतिनिधी नियुक्त केले असून हक्कांची पायमल्ली झाल्यास आपणास त्यांच्याशी संपर्क साधता येतो. अशी सारी यंत्रणा निर्माण झाली असताना या हक्कांबाबत जनसामान्याने उदासीन राहणे योग्य नाही. शाळा, महाविद्यालयांतून, विद्यापीठातून, संघटना, संस्थांतून प्रत्येकास यांची माहिती दिली गेली पाहिजे.

 मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यानुसार प्रत्येक मनुष्य स्वतंत्र असून तो समान हक्कांचा अधिकारी आहे. हे हक्क त्यास कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता मिळायला हवेत, प्रत्येक माणसास जगण्याचा, संरक्षण मिळविण्याचा हक्क आहे. कोणत्याही कारणाने माणसास गुलाम अथवा वेठबिगार करता कामा नये. कोणासही कुणावर अत्याचार करता येणार नाही. कुणास अपमानास्पद वा भेदाची वागणूक देता कामा नये. या सर्वांमागे प्रत्येक माणसास प्रतिष्ठेने, सन्मानाने जगता आले पाहिजे अशी भावना आहे. मानवी हक्कांनुसार कायद्यापुढे सर्व समान मानण्यात आले आहेत. प्रत्येक राष्ट्रीय घटनेत मूलभूत हक्क निश्चित करण्याचा आग्रह धरण्यात आला असून त्यांच्या अंमलबजावणीची व्यवस्था बंधनकारक मानण्यात आली आहे. मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध दाद मागण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास देण्यात आले आहे. अपराध सिद्ध होईपर्यंत प्रत्येक माणसास निर्दोष समजण्याचा व तशी वागणूक व संरक्षण मिळण्याचा हक्क आहे. प्रत्येक माणसास आपले खासगी आयुष्य (rivacy) जपण्याचा फार महत्त्वाचा मानवी हक्क प्रत्येकास आहे. प्रत्येकास मर्जीनुसार नागरिकत्व धारण करण्याचा, भटकण्याचा, शरण घेण्याचा अधिकार आहे. या हक्कामुळेच आंद्रे साखारोव, सोल्झेनित्सिन, सलमान रश्दी, तस्लिमा नसरीन, बेनझीर भुट्टो प्रभृती वाचू शकले हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. प्रत्येकास घर, नोकरी, पालकत्व, विवाह, शिक्षण, आरोग्य सुधारणा व सोयी मिळण्याचा हक्क अशासाठी मान्य करण्यात आला आहे, की जेणेकरून प्रत्येकाचे जगणे सुसह्य व्हावे. जगण्याचे साधन असलेली संपत्ती, नोकरी कुणासही अनधिकारपणे आता हिसकावून घेता येत नाही. तसे झाल्यास सामान्य माणसास दाद मागता येते. तो गरीब असेल तर अशी दाद मागण्यासाठी कायदेशीर साहाय्य (वकील) मोफत मिळणे हा सामान्याचा हक्क आहे. प्रत्येकास उपजीविकेचे साधन मिळण्याचा, समान कामास समान वेतन मिळण्याचा हक्क आहे. इतकेच नव्हे तर दुर्बलत्व, अपंगत्व, उपेक्षा, असमर्थता इत्यादीवर मात करण्याची संधी व सुविधा मिळण्याचा हक्क आहे. मातृत्व, बालपण, सुरक्षेचा अधिकार हा या हक्क व्याप्तीचाच भाग होय. सांस्कृतिक संरक्षण, कलेचा आनंद घेता येणे इतकेच काय विज्ञानाने प्राप्त प्रत्येक प्रगतीवर जगातील सर्वांचा समान हक्क मानण्यापर्यंत जग उदार

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/४५