पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानवाधिकार जागृती : भारतापुढील आव्हान

 मध्य युग कर्तव्याचं होतं तर आधुनिक युग हक्कांच्या संरक्षणाचं पण एकविसावं शतक मात्र बंधुतेचं असणार अशी आशा जगभरचे समाजशास्त्रज्ञ बाळगून आहेत. त्याला आधार आहे मानवी हक्क जागृतीचा. सेंट थॉमस अँक्वायन्स हा महान ग्रीक तत्त्ववेत्ता मानवी हक्कांचा जनक मानला जातो. हे वर्ष त्यांचं सप्तशतकोत्तर रौप्योत्सवी स्मृतिवर्ष म्हणून जगभर साजरं झालं. आपल्याकडे या महान तत्त्ववेत्त्याबद्दल काहीही छापून आलेले नाही. भारतात मानवी हक्कांबद्द्ल जागृती नसण्याची जी अनेक कारणे आहेत त्यात अज्ञान, लोकसंख्या वाढ, साधनांची कमतरता ही जशी कारणे आहेत त्यापेक्षा ज्ञान व विकासाबद्दलची अनास्था हे देखील महत्त्वाचे कारण आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. ही अनास्था दूर व्हायची तर मानवी हक्कांबद्दल जागृती येणं आवश्यकच नाही तर अनिवार्यही आहे. जागतिक मानवी हक्क दिन' साजरा करण्यामागे हक्कांबद्दलची जागृती जनसामान्यांमध्ये निर्माण करून जनसामान्यांच्या रेट्यातून ‘अधिकाराचं अधिराज्य निर्माण करण्याची कल्पना आहे.

 संयुक्त राष्ट्रसंघाने १० डिसेंबर १९४८ मध्ये ‘मानवी हक्कांचा जाहीरनामा मंजूर केल्याची आठवण जपण्याच्या हेतूने जगभर आजचा दिवस ‘जागतिक मानवी हक्क जागृती दिन' म्हणून साजरा केला जातो. मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यास पन्नास वर्षे झाली तरी आपणाकडे त्याबद्दलची प्राथमिक जागृती होऊ शकली नाही. आपणाकडे राजकीय संक्रमण प्रभावी आहे. भारत आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करूनही ‘विकसनशील देश म्हणूनच राहिला. तो ‘विकसित देश' झाला नाही. याचे कारण इथे हक्कांबाबत

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/४३