पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अपूर्व विश्वास निर्माण केला. पूर्व बर्लिनच्या सेंट निकोलस चर्चसमोर अंधारात हजारो लोक जमले. पुढे ते कार्ल मार्क्स चौकात शिस्तीने संचलन करीत सरसावले. लोकप्रक्षोभ व लोकशक्तीपुढे सैन्याने हात टेकले. लाखोंच्या संख्येने पश्चिम बर्लिनमध्ये कूच केलेल्या जनतेने मनमुराद चॉकलेट्स, केळी खाल्ली. 'लाडा' गाड्यांचे ताफेच्या ताफे हॉर्न वाजवत बर्लिनमध्ये जल्लोष करीत फिरले. चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पश्चिम बर्लिनकडे येणारा पूर्व बर्लिनवासीयांचा लोंढा मी मे ९० मध्येही त्याच उत्साहाने पाहत होतो. रस्त्यावर दुतर्फा फ्रीज, टी.व्ही., टेपरेकॉर्डरची दुकाने, रस्त्यावर चलनाची देवघेव, कपड्यांच्या, खाद्यपदार्थांच्या दुकानातली गर्दी नि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पूर्व-पश्चिमवासीयांचे एक होणे पाहणे म्हणजे 'ग्लोबल व्हिलेज'चा हृद्य प्रत्ययच!

 मे १९९० मध्ये मी पूर्व नि पश्चिम अशी बर्लिनची दोन्ही रूपं पाहिली! सकृतदर्शनी दोन्ही बर्लिनमध्ये असणारे महदंतर क्षणात लक्षात यायचे! नाही म्हटले तरी पूर्व बर्लिनवर उदासीचं सावट गडदच होतं! तेथील गॅस्टपोचे मुख्यालय पाहताना १९९० मध्येदेखील माझ्या अंगावर १९३५ चा शहारा आल्याशिवाय राहिला नव्हता! आज ९ नोव्हेंबर १९९९. बर्लिन भिंतीची दशकोत्सवी बलिप्रतिपदा. एकीकृत जर्मनीत हा दिवस आपल्या दिवाळी पाडव्याच्या उत्साहानेच साजरा होत आहे. त्याची तयारी जर्मनवासीयांनी गेल्या वर्षीपासूनच सुरू केलीय. आता बर्लिनची भिंत नाही. नाही म्हणायला या भिंतीचे अवशेष, टॉवर्स अनेक युरोपीय देशातील वस्तुसंग्रहालयात आढळतात. पॅरिसच्या ‘ला डिफेन्स' या नियोजन परिषदेच्या इमारतीच्या मुख्य द्वारासमक्षच या भिंतीचे अवशेष उभे करण्यात आले आहेत. जणू ते येणा-या जाणाच्या प्रत्येक स्वातंत्र्यप्रेमी नागरिकास सांगत असतात, “यापुढे ‘बादशहा', ‘हुकूमशहा' होणे नाही." (तरी मुशर्रफ होतोच!) नुसत्या दडपशाहीच्या जोरावर साम्राज्य टिकवणे खर्चाचे असते. शिवाय त्यातून शत्रू निर्माण होत असतात. गेल्या १३ ऑगस्ट १९९८ ला जर्मनवासीयांनी ७0 मीटर लांबीचा एक स्मृतिपट्टा भिंतीच्या जागी आखून स्मारक म्हणून जपलाय! परत बळीचं राज्य येऊ नये म्हणून! कुणाचा अकारण, अमानुष बळी जाऊ नये म्हणून! इडा, पिडा टळो, सर्वत्र सुख साम्राज्य नांदो म्हणून बलिप्रतिपदा (पाडवा) साजरा करतात. यावर्षी याच दिवशी येणारा बर्लिन भिंतीच्या उत्सर्जनाचा दशकपूर्ती उत्सव व आपला पाडवा - दोहोतील मूल्य, सांस्कृतिक महात्म्य एकच! इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ते खरंय! पण दुष्ट साम्राज्याची पुनरावृत्ती मात्र कुठेही, कोणत्याही झेंड्या वा विचाराखाली होता कामा नये!

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/४१