पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जगभरच्या कम्युनिस्ट राजवटींची पुनर्रचना सुरू झाली. पूर्व जर्मनीबरोबरच पोलंड, झेकोस्लोवाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गेरियाबरोबर खुद्द रशियातही उदारमतवादाचे वारे वाहू लागले. तत्पूर्वी या देशात केंद्रीय सत्ता केंद्रे, उत्पादन एकाधिकार, जीवनावश्यक वस्तूंचा सतत तुटवडा, पक्षश्रेष्ठींचा धनवान समाज, सवलती भोगणारे विलासी कार्यकर्ते अशा विषम व विचित्र स्थितीत राज्य करणा-या साम्राज्यास रोनाल्ड रेगन तर ‘दुष्ट साम्राज्य'म्हणून संबोधत! गोर्बाचेव्ह यांनी हे चित्र बदलायचा ध्यास घेतला. स्वतः मोठी मेहनत घेऊ लागले. 'मी करतो तेवढी तरी मेहनत घ्या' म्हणून कार्यकर्त्यांची कानउघाडणी करू लागले. चेर्नोबील घटनेने अण्वसबंदी विचाराला गती आणली. आंद्रे साखारॉव्हसारख्या शास्त्रज्ञ व विचारकाची सुटका करून त्यांनी आपल्या उदार धोरणाने अमेरिकेचा विश्वास संपादन केला. सार्वत्रिक निवडणुका मुक्त वातावरणात घेऊन त्यांनी जगाला आपली पारदर्शिता प्रत्ययास आणून दिली. अभ्यासक्रमात वास्तव इतिहासाचे अध्यापन सुरू केले नि पाहता पाहता युद्धाचे ढग विरून गेले.

 १९८९ हे वर्ष जगाच्या इतिहासात ‘क्रांतीचे वर्ष' म्हणून नोंदले गेले, ते आंतरराष्ट्रीय राजकारणात सुरू झालेल्या 'डॉमिनो इफेक्ट'मुळे. 'डॉमिनोस' हा पूर्व युरोपातील एक प्रसिद्ध खेळ. त्यात छोट्याशा परंतु लांबट चौकोनी पातळ चकत्या वापरल्या जातात. या चकत्या अरुंद बाजूने उभ्या केल्या जातात. पहिली चकती अलगद टिचकी मारुन उडविली की सगळ्या चकत्या एकानंतर एक पडत राहतात-पत्त्याच्या बंगल्यासारख्या. या वर्षी हंगेरी, पोलंड, पूर्व जर्मनी, बल्गेरिया असे एकानंतर एक करत सर्व कम्युनिस्ट राष्ट्रांत उठाव झाले व तेथील जुलमी सत्तेचा अंत झाला. विशेषतः हगेरीत उठाव झाल्यानंतर अनेक पूर्व बर्लिनवासी पश्चिम बर्लिनकडे वळले. त्यात गोर्बाचेव्ह यांनी पूर्व जर्मनीचे प्रमुख एरिक होनेकर यांना जर्मन भेटीत येथून पुढे रशिया मदत करणार नसल्याचे स्पष्ट केले. “जे प्रशासक प्रजेच्या आकांक्षांना प्रतिसाद देत नाहीत ते नंतर अडचणी येतात, इतकेच समजावून ते थांबले नाहीत, तर ‘जे या बाबतीत टाळाटाळ करतात त्यांना नियतीच शासन करते, असे सुनावले नि मग मात्र जर्मनीचे काटे उलटे फिरू लागले. लोकांनी रस्त्यावर येऊन ‘गॉर्जी, गॉर्जीचा घोष केला! “अहिंसेची मागणी केली, “आम्हाला जगायचंय!' म्हणून टाहो फोडला! प्रथम कम्युनिस्ट राजवटींनी ही निदर्शने दडपायचा प्रयत्न केला पण रस्त्यावर येणा-यांच्या संख्येपुढे होनेकर शासन व सेना हतबल झाली. पूर्व जर्मनवासीयांनी मुक्त निवडणुकांची मागणी केली, प्रवासाचा हक्क मागितला. लिपझीग शहरातील उग्र निदर्शनांनी पूर्व जर्मनवासीयांत

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/४०