पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या तत्कालीन दोस्त राष्ट्रांनी बर्लिनवर संयुक्त नियंत्रण स्थापन केले. जून १९४८ ला मतभेदामुळे रशिया संयुक्त नियंत्रण समितीतून बाहेर पडला. ३० नोव्हेंबर, १९४८ ला बर्लिनचे विभाजन होऊन पूर्व बर्लिनवर रशियाचा कब्जा झाला. १९५३ च्या सुमारास रशियाव्याप्त बर्लिनमध्ये कम्युनिस्ट शासनाविरुद्ध दंगे झाले. परिणामतः पूर्व बर्लिनवासीयांचे लोंढेच्या लोंढे पश्चिम बर्लिनकडे स्थलांतरित होऊ लागले. ते थोपवण्यासाठी रशियन राजवटीने ‘ब्रांडेनबुर्क गेटपासून दक्षिणोत्तर ४७ किलोमीटर लांबीची भिंत उभारली. ही ‘बर्लिनची भिंत' म्हणून इतिहासप्रसिद्ध झाली. या भिंतीच्या बारा दरवाजांतून ये-जा करण्यासाठी परवान्याची पद्धत सुरू झाली, ती ऑक्टोबर १९९० पर्यंत होती. मला आठवतं, ३० मे १९९० रोजी पश्चिम बर्लिनच्या चार्ली चेकपॉईंटवरून असाच तात्पुरता परवाना घेऊन मी पूर्व जर्मनीत प्रवेश केला होता. तो रोमांचक क्षण आजही जसाच्या तसा माझ्या डोळ्यांसमोर आहे.... युरोपच्या प्रवासात फ्रान्स, स्वित्झर्लंड, इटली, ऑस्ट्रियाचा दौरा करून मी पश्चिम जर्मनीत प्रवेश केला होता. म्युनिक, हॅनोव्हर शहरांची भटकंती करून ‘बर्लिनची भिंत' पाहण्याच्या, पाडण्याच्या अनिवार ओढीतून पश्चिम बर्लिनच्या ‘झुऑलॉजिकल गार्डन'स्टेशनवर उतरलो. सर्वत्र जर्मन भाषेचा बोलबाला, मला त्या भाषेतील ‘ओ’ की ‘ठो'ही येत नव्हते. जर्मन नागरिक सामान्यपणे जर्मन बोलणेच पसंत करतात. राष्ट्राभिमानी लोक एक तर जर्मनमध्ये नाही तर जपानमध्येच पाहावेत! महत्प्रयासाने मी एक विदेशी पर्यटक गाठला. ते इंग्लंडचे गृहस्थ होते. भारतातील ब्रिटिशांची पुण्याई (?) इंग्रजी उपयोगाला आली. बर्लिनमध्ये काय काय पाहण्यासारखे आहे म्हटल्यावर रॉबर्ट मिचेल म्हणाला होता, तुम्ही बर्लिनमध्ये काही पाहा न पाहा पण भिंत पाहायला जा. कारण ती परत पाहता येणार नाही. त्याच्या म्हणण्यातील गांभीर्य लक्षात घेऊन मी चार्ली चेक पॉईंट'ची बस पकडली. पश्चिम बर्लिन डोळेभर पाहत ‘चार्ली चेकपॉईंट'वर उतरलो. अध्र्यामुर्त्या पडलेल्या त्या भिंतीवर भाड्याने छन्नी हातोडा घेऊन प्रहार मारणारे कितीतरी देशी-विदेशी नागरिक मी पाहिले.... अनुभवले... स्तब्ध व निष्क्रिय रशियन सैनिकही पाहिले.... त्यांच्या खांद्यावर बंदुका होत्या पण बहुधा उलट्या..... अस्ताला गेलेल्या आपल्या अन्यायी राजवटीला जणू शोक सलामी देतच ते उभे होते. निस्तेज, निष्प्राण, निष्क्रिय....

 शेतीतील दुष्काळ, व्यापारातील मंदी, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा अशा अनेक प्रकारच्या आर्थिक व राजकीय पारिणामांचे बळी ठरलेले पूर्व बर्लिनवासी १९६१ च्या प्रारंभापासून ते ऑगस्ट १९८९ पर्यंत पश्चिम

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/३८