पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नसीमा हुरजूक, कांचन परुळेकर, पवन खेबूडकर, हुसेन जमादार, डॉ. रूपा शहा, प्रा. विठ्ठल बन्ने प्रभृतींनी आपापल्या क्षेत्रात अक्षरशः हिमालयासारखं काम केलं. अनाथ, अपंग, मतिमंद, मूकबधिर, अंध, परित्यक्ता, हुंडाबळी, देवदासी आदी राजकीय परीघावर दुर्लक्षित राहिलेल्या उपेक्षितांचे अंतरंग जाणून या संस्था व कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंद झाली. यापेक्षा अधिक महत्त्वाचे असे की, ही कामे तळागाळातील, ग्रामीण, गरजू लाभार्थीपर्यंत पोहोचली. या सर्व सेवा वरील संस्था नि व्यक्तींनी गरजूंना मोफत पुरविल्या व तेही स्वतः कसलेही मानधन न घेता त्या संस्थेत कार्यरत राहिले. लीलाताई पाटील यांचं सृजन आनंद केंद्र हे शैक्षणिक असलं तरी त्याचं समाज परिवर्तनासंदर्भात आगळे महत्त्व आहे.
 सोलापूरच्या 'जिव्हाळा' या मतिमंदांच्या शिक्षण व पुनर्वसन कार्य करणाच्या संस्थेने आपल्या 'पालवी' प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रात एक वेगळी वाट चालून मतिमंदांच्या पूर्ण पुनर्वसनाचा वस्तुपाठ महाराष्ट्रापुढे ठेवला. प्राचार्य रणदिवेंनी मतिमंदेतर अपंगांच्या संगठनाचेही कार्य केले. बालगुन्हेगारांच्या संगोपन, संरक्षण, शिक्षण, पुनर्वसन कार्यात दक्षिण महाराष्ट्रातील सर्वच निरीक्षणगृहांनी आपल्या संस्थांना ‘मुक्तांगण' बनवून नव्या दृष्टीचा परिचय दिला. डॉ. श्याम तोष्णीवाल सोलापुरात विकसित करत असलेले निरीक्षण गृह (रिमांड होम) हे यापैकी एक होय. अरुण देशपांडेंचा विज्ञान प्रकल्पही रेखांकित करता येईल.
 सांगलीचे वेलणकर बालिकाश्रम, दादूकाका भिडे निरीक्षण गृह, सुंदरबाई मालू कन्या अभिरक्षणगृह, भगिनी निवेदिता संस्थेचे एड्सग्रस्तांचे पुनर्वसन केंद्र, पाठक अनाथाश्रम, मिरज, मिरजेची मनोरुग्ण नि सांसर्गिक रोग नियंत्रण केंद्रे यांनी या परिसरात माणुसकीचा गहिवर जपला. या जिल्ह्याने दक्षिण महाराष्ट्रात अनेक नवीन उपक्रम सुरू करण्यात जनकत्वाचे कार्य केले. एड्सग्रस्त महिला व मुलींचे पुनर्वसन केंद्र या संदर्भात ठळकपणे लक्षात येते. डॉ. मुकुंदराव पाठक, रेवती हातकणंगलेकर, वेलणकर, मराठे कुटुंबीयांनी इथे सामाजिक कार्यास प्रसिद्धीपराङ्मुखतेची झालर जोडली.

 ‘उपरा'कार लक्ष्मण माने यांचं भटक्या व विमुक्तांचं अखिल भारतीय मंडळ व त्यामार्फत चालविल्या जाणा-या शैक्षणिक संस्था, आश्रमशाळा, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या तपातून साकारलेली प्राज्ञ पाठशाळा व विश्वकोश मंडळ ही सातारा जिल्ह्याने दक्षिण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला दिलेली देणगी होय. या संस्था व व्यक्ती त्रयींनी आधुनिक महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे मोठे कार्य केले.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/३४