पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांच्या कार्याचे वेगळेपण



 दक्षिण महाराष्ट्र हा सामाजिक, शैक्षणिक, सहकारासारख्या क्षेत्रातील आघाडीवरचे कार्य करणारा भाग म्हणून सर्वत्र परिचित आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यांनी वेढलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज, सावंतवाडी आदी ठिकाणी पूर्वी संस्थाने होती. तत्कालीन संस्थानिकांनी आपापल्या संस्थानात अनेक लोककल्याणकारी कार्यांना केवळ प्रोत्साहनच दिले नाही, तर त्यांच्या पाठीशी भक्कम अर्थबळ उभे केले. घाटगे, भोसले, पटवर्धन आदी घराण्यांनी याकामी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे नाव या संदर्भात रेखांकित केले नाही, तर आजच्या सामाजिक कार्याचा आढावा म्हणजे पृष्ठभूमीशिवाय चित्राची कल्पना केल्यासारखे होईल. दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानिकांनी साहित्य, संगीत, कला, शिक्षण याबरोबरीने सामाजिक कार्याच्या विस्ताराकडे, मजबुतीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.

 स्वातंत्र्यानंतर नि तेही विशेष करून महाराष्ट्र राज्यात दक्षिण महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थांचे चांगले जाळे विकसित झाले. महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या कामांच्या तुलनेत दक्षिण महाराष्ट्रातील सामाजिक संस्था वेगळा चेहरा घेऊन पुढे येतात. एकतर या सर्व संस्था प्रथम सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या अंगमेहनतीने आरंभिल्या. त्यांना त्यांनी आपल्या समर्पण व सेवावृत्तीने लोकाश्रय मिळविला. पुढे शासनाचे अर्थबळ, नैतिक पाठबळ त्यांना लाभले. लोकमान्यता मिळाली. येथील प्रसार माध्यामांनी सामाजिक कामांकडे उदारपणे पाहिले व त्यांचे बळ कसे वाढेल अशी सतत विधायक भूमिका घेतली. दक्षिण महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांना स्थानिक समृद्धीमुळेच अर्थबळ लाभले

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/३२