पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हाउसेस' केले होते. इथं त्यांनी मराठा, जैन, लिंगायत, सारस्वत, मुस्लीम, दैवज्ञ, पांचाळ, सुतार, चांभार, शिंपी, वैश्य, ख्रिश्चन, कायस्थ, आर्य, कोष्टी अशी विविध (वीस) जाती व धर्मासाठी वसतिगृहे सुरू केली. यामागील भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले होते, ‘सर्व जातीच्या पुढा-यांना माझे सांगणे आहे, की आपली दृष्टी दूरवर ठेवा. पायापुरते पाहू नका. जातिभेद मोडणे इष्ट आहे, जरूर आहे. जातिभेद पाळणे पाप आहे. देशोन्नतीच्या मार्गात हा अडथळा आहे. हा अडथळा दूर करण्याचे प्रयत्न जोराने केले पाहिजेत."
 आज तरी भारत जातीयतेच्या जोखडातून मुक्त दिसायला हवा होता. वसतिगृहे ख-या अर्थाने सर्व जाती-धर्मासाठी खुली व्हायला हवी होती. व्यवस्थापनातही सर्व जाती-धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश असायला हवा होता. या वसतिगृहांना अशी उर्जितावस्था आणणे यातच शाहूंच्या विचारांची सुसंगती आहे. दुर्दैवाने धर्म, जाती आजही आपणास अल्पसंख्य घोषित करावे म्हणून मागणी करताना दिसतात. या संदर्भात शाह महाराजांनी जपानचे दिलेले उदाहरण विचारणीय आहे. त्यांनी ‘जपानमधील ‘सामुराई' लोकांनी आपला जन्माने प्राप्त झालेला उच्च दर्जा सोडून दिला म्हणून जपानमध्ये ऐक्य होऊन त्या देशाची उन्नती झाली,'असे म्हटले होते. जाती मत्सर सोडल्याशिवाय जशी देशाची उन्नती होत नसते तशी जातीय अहंकार जोपासण्यानेही होत नसते हे आपण ध्यानात ठेवायला हवे. शाहू महाराज अशा जातीय व धार्मिक व्यवहारांना 'Religious Bureaucracy' असा शब्द आपल्या भाषणात वापरायचे. ती मोडून काढण्याचा त्यांचा संकल्प होता. मात्र वर्तमानात ती अधिक मजबूत होते आहे, हे शाहूंच्या विचाराशी विसंगतच नव्हे का? जाती, धर्मनिरपेक्ष समाजाकडे आपला प्रबोधन प्रवास होणे म्हणजेच छत्रपती शाहूंच्या विचारांशी वर्तमानाची सुसंगती साधणे होय.

 सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला आवश्यकता आहे, असे कळकळीचे उद्गार छत्रपती शाहूंनी काढले होते. आपल्या या विचारांच्या अनुषंगाने त्यांनी अनेक संस्था व व्यक्तींना साहाय्य दिले. डॉ. आंबेडकरांना त्यांनी दिलेले साहाय्य या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे. छत्रपती शाहूंची दृष्टी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती. समग्र भारत त्यांच्यापुढे होता. आज आपल्या देशात सर्व विकास हा ‘बहुराष्ट्रीय आधारावर' होतो आहे. साक्षरता अभियानातील ‘राष्ट्रीय साक्षरता मिशन'साठी देखील ‘युनिसेफ' सारखी संघटना आधार देते म्हणून काही घडतंय. बालमजुरीच्या हद्दपारीच्या प्रयत्नांमागील सत्यही हेच आहे. शिक्षण प्रसाराबद्दल पूर्वीचं नि सध्याचंही

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/२३