पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्थागत प्रशासनातील एकसुरी, सामूहिक दिनक्रमामुळे ही मुले जगरहाटीचे संस्कार न झाल्याने एकांगी बनतात. आपण अनाथ, अनौरस, निराधार, उपेक्षित आहोत याची बोचणी त्यांना क्षणोक्षणी क्षत-विक्षत करत असते. यावर मात करून शिकणाच्या मुलांना अपवादानेच प्रशंसा, कौतुकाचे प्रोत्साहन मिळते. शालान्त शिक्षणाची मर्यादा ओलांडणारी मुले अशा संस्थांतून अपवादानेच दिसून येतात. आजच्या बालकल्याण व्यवस्थेत मुलास १६, मुलीस १८ वर्षांपर्यंतच संगोपन व शिक्षणाची व्यवस्था आहे.पुढे अनुरक्षणगृहांची व्यवस्था २१ वर्षांपर्यंत असली तरी तेथील व्यवस्थेचा सुमार दर्जा पाहता तिथे न जाता मुले स्वबळावर स्वावलंबी होणे पसंत करतात. आजच्या बालकल्याण यंत्रणेत १ दिवसाचे अनाथ अर्भक १८ वर्षे सनाथ करायचे व त्यांच्या सुयोग्य पुनर्वसनाची योग्य व्यवस्था नसल्याने परत ऐन उभारीच्या व धोक्याच्या वयात अनाथ, निराधार करायचे दुष्टचक्र सामावलेले आहे. मुलींच्या बाबतीत हा प्रश्न अधिकच गंभीर आहे. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह, पुनर्वसनाचा बिकट प्रश्न उभा राहातो. विवाहव्यवस्थेवर असलेला जातिप्रथेचा प्रभाव, नातेसंबंधांची अपेक्षा, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, हुंडा, जमीन, जायदाद इ. चे कोणतेच भांडवल नसलेल्या या मुलींच्या विवाहाच्या बाबतीत इतर मुलींना मिळाणारे स्वावलंबी, निष्कलंक, निर्व्यसनी वर अपवादानेच मिळतात. या मुलींना ब-याचदा घटस्फोटित, बिजवर, विधुर, व्यंग वा इतर कमतरता असलेल्या वराशी विवाह करावा लागतो. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलांचे विवाह आर्थिक स्वालंबनानेच शक्य होतात. पण अशा मुलींना मात्र समाज आजही स्वीकारत नाही हे कटू सत्य आहे. परिणामी अनैतिक संबंधातून जन्मलेल्या या मुलींना आपले जीव अस्तित्व टिकवण्यासाठी ‘शरीर' या एकमेव भांडवलाचा उपयोग करून रखेली, वेश्या, कुमारीमाता बनून परत संस्थेत आश्रय घ्यावा लागतो. हे विदारक चित्र समाजाच्या संवेदनशील हृदयाला स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर तरी परिवर्तन व पुनर्वसनासाठी साद घालणार आहे का? हा खरा प्रश्न आहे.

 जी स्थिती विवाहपूर्व संबंधातून निर्माण होणा-या संततींची त्यापेक्षा भयानक, परिस्थिती विवाहोत्तर जीवनात विवाहबाह्य संबंधातून निर्माण झालेल्या संततींची असते. एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, आज विवाहपूर्व संबंधातून जितक्या मोठ्या प्रमाणात संतती निर्माण होते तितक्या मोठ्या प्रमाणात विवाहोत्तर काळातील अनैतिक संबंधातून संतती निर्माण होत नाही.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१९