पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळते, तिचा आधार भाषाच असतो. व्यापार, उद्योगात, प्रवास, पर्यटनातही भाषेचे, संवाद कौशल्यांचे महत्त्व वाढते आहे. ‘शब्द शस्त्र आहे. त्याचा जपून वापर करा' असं शाळेच्या तुळईवर लिहिलेलं सुभाषित आज जगण्यात ब्रह्मवाक्य होते यावरून भाषेचे महत्त्व अधोरेखित होते. भाषा हृदयाचा ठाव घेणारी असते. ती मधुर हवी. ती संवादी हवी. असं जे आज वारंवार सांगितलं जातं ते वक्तृत्वास जगण्यात आलेल्या महत्त्वामुळे. आज आपले जीवन राजकारणकेंद्री झाले आहे. राजकारणाची सारी मदार, उतार-चढ़ाव सारे भाषिक प्रयोगावर बेतलेले असते. म्हणून नव्या पिढीने उच्च शिक्षणात प्राधान्याने भाषिक अभ्यासक्रम निवडले पाहिजेत. भाषेतील पदवी म्हणजे जगण्याचा, सुखी जीवनाचा परवाना मानून नवी क्षितिजे कवेत घेण्यासाठी भाषिक अभ्यासक्रमांना जगण्याचे सशक्त साधन म्हणून स्वीकारले तर त्यांच्या आयुष्याचे सोने होईल.

■■










एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१९०