पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/189

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शब्द व मिनिटावर पैसे मोजणारी क्षेत्रे बनली आहेत. अनुवादकास आज पानावर दर ठरवून पैसे दिले जातात. दुभाषी मिनिटावर आपले मूल्य वसूल करतो. स्त्रियांना घर, मुले-बाळे सांभाळून इंटरनेट, संगणक, ई-मेल द्वारे अनुवाद, लेखनकार्य करून हजारो रुपये मिळतात. पत्रकारिता, वाहिन्या, वृत्तसंस्था, आकाशवाणी, दूरदर्शन या विभागातही मोठी मागणी आहे. युवकांपेक्षा या क्षेत्रात युवती, महिला आघाडीवर असल्याचे सार्वत्रिक चित्र बनले आहे. त्यामुळे 'नर्स' सारखे हे क्षेत्र महिलांचे अधिकारक्षेत्र बनले आहे. जागतिक पर्यटन व्यवसाय हा पूर्णपणे भाषेच्या जोरावर चालतो. संपर्क, प्रचार, समुपदेशन, मार्गदर्शन, सहल संयोजक सर्व ठिकाणी अनुवाद व दुभाषी अशा जोड भूमिका वठवणाच्या व्यक्तींना प्राधान्याने घेऊन अधिक वेतन दिले जाते. सिनेमा दूरदर्शनमध्ये ध्वनिमुद्रणात अनुवाद (डबिंग) चे महत्त्व वाढते आहे. चित्रपट अनेक भाषांत एकाच वेळी प्रकाशित करणे केवळ अनुवादामुळे शक्य झाले आहे. हिस्ट्री, नॅशनल जिऑग्राफी, कार्टून्स इ. चॅनल्स केवळ अनुवादाने बहुभाषिक, बहुदेशी झालीत.
पत्रकारिता/माध्यम विकास
 विधीपालिका (विधिमंडळ/संसद), न्यायपालिका (न्यायालये), कार्यपालिका (प्रशासन) या देशाच्या तीन आधारभूत स्तंभांनंतर चौथा स्तंभ मानला जातो पत्रकारितेस. यात मुद्रित पत्रकारितेबरोबर महाजालीय पत्रकारिता (आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तवाहिन्या) ही अंतर्भूत असतात. हे क्षेत्र आज जीवनातील सर्वाधिक प्रभावी साधन व माध्यम मानले जाते. याची सारी मदार असते ती भाषेवर. वृत्त लिहिणे, वृत्त संपादणे, वृत्त चित्रीकरण, वृत्त प्रक्षेपण, वृत्त निवेदन, वृत्त विश्लेषण, वृत्त संवाद, मुलाखती सर्वांसाठी लागते ती भाषा. मुद्रित माध्यमात पत्रकार व संपादकांचा भाव रोज वधारतो आहे. एका वृत्तसंस्थेतून दुस-या संस्थेत गेले की किमान दहा हजार रुपयांची वाढ होते. इथले वेतनही शिक्षक, प्राध्यापकांशी स्पर्धा करणारे ठरले आहे. शिवाय समाजात धाक, मान्यता, आदर मिळतो तो वेगळा. मुद्रित माध्यमांपेक्षा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रभाव व प्रतिष्ठा वर्तमान समाजमानसात मोठी आहे हे वेगळे सांगायला नको. इथे वार्षिक वेतन लाखांच्या घरात बोलले जाते. ही क्षेत्रे कॉर्पोरेट वा बहुराष्ट्रीय बनत चालल्याने भाषा प्रभुत्वावर इथले मोल व मूल्य ठरते.
छायाचित्रण/छायांकन/ध्वनिमुद्रण

 ही कौशल्याची व तंत्रिकदृष्ट्या नाजूक क्षेत्रे असली आणि ती पत्रकारिता

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१८८