पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 रुपयांच्या घरात मानधन मिळते हे भाषेचे वाढते मूल्य स्पष्ट करणारे आहे. तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात कार्य, व्यवसाय, नोकरी करत भाषेच्या बळावर कवी, नाटककार, कादंबरीकार, टीकाकार, वक्ता होऊन अधिक पद, प्रतिष्ठा, धन कमावून समाजापुढे सेलेब्रिटी, रोल मॉडेल' होऊ शकता. साने गुरुजी, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, नारायण सुर्वे, सुरेश भट, ही नावे जुनी झाली म्हटली तर आज द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या साहित्याचे मोल सदाबहार ठरते आहे. त्यांच्या साहित्यकृतींवर मालिका, चित्रपट बनून ते घरोघरी पोहोचत आहेत. 'श्यामची आई' हे त्याचे सार्वत्रिक चित्र म्हणून सांगता येईल. 'ययाती' माहीत नाही असा मराठी माणूस मिळणं दुर्मीळ! तुमच्या साहित्याचे अनुवाद अन्य देशी, विदेशी भाषांत होऊन तुम्ही जगप्रसिद्ध होणे आजच्या संगणक, इंटरनेट व जागतिकीकरणाच्या युगात नित्याची गोष्ट होऊन गेली आहे. समीक्षेशिवाय दैनिकाची पुरवणी वा नियतकालिक नसते हे पण आपण लक्षात ठेवले पाहिजे.
अनुवादक/दुभाषी

 माहिती व संपर्कक्रांतीच्या या युगात दळणवळण व संपर्कमाध्यमात इतकी गती आली आहे की जगाचे अंतरच संपून गेले आहे. जग World Wide Web (www) मुळे खेडे बनून एक झाले आहे. त्यामुळे माणसाचे बहुभाषी होणे आवश्यकच नाही तर अनिवार्य झाले आहे. भारतीय माणूस एका दिवसात देशाच्या या टोकापासून ते दुस-या टोकापर्यंत जाऊन परत येणे शक्य झाले आहे. तीच गोष्ट विदेशाची. विदेशी जाण्याचे, ‘फॉरेन रिटर्न म्हणून घ्यायचा काळ केव्हाच मागे पडला आहे. या बदलत्या स्थितीमुळे प्रत्येक भारतीयास सर्व भारतीय प्रांतभाषांची ओळख असणे आवश्यक वाटू लागले आहे. भारतीयांचे ‘आंतरभारती' असणे व त्याचवेळी तो ‘आंतरराष्ट्रीय असणे काळाची गरज होते आहे. माणसात शेकडो भाषांच्या संपादनाची बौद्धिक क्षमता असली तरी व्यवहारात ते अन्य व्यवधानांमुळे उतरणे अशक्यप्राय होते. अशा वेळी अनुवादक व दुभाषा असणे वरदान ठरते. अनुवाद व दुभाषी होण्यासाठी पदवीशिक्षणानंतर अनेक विद्यापीठात प्रमाणपत्र, पदविका व पदवी पाठ्यक्रम आहेत. तुम्ही अनुवादक वा दुभाषी म्हणून प्रावीण्य संपादन केल्यानंतर तुम्हास विदेशी सेवा विभाग, पत्रकारिता, पर्यटन, प्रकाशन, भाषा संपर्क इ. क्षेत्रात तर गलेलठ्ठ पगार मिळतोच पण आज विधी व वैद्यक क्षेत्रात लिप्यंतरण (Transcription), लिपिसर्जन/ अनुवाद (Translation) रूपांतर, भाषांतर, द्वैभाषिक संवाद इ. क्षेत्रे म्हणजे

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१८७