पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युक्त करून प्राथमिक शिक्षण सर्जनात्मक व आनंददायी बनवले. आता आपल्या महाराष्ट्र राज्याने आपल्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव, संस्थापक मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी साजरी करून शिक्षणाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे ठेवण्याचा संकल्प व निर्धार करत बाराव्या पंचवार्षिक योजनेत ‘राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान यशस्वी करण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्यामागे सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षण कायदा (२००९) अनुसार वाढणारे प्राथमिक शिक्षणमान आपल्या डोळ्यासमोर आहे. महाराष्ट्र राज्याचे नियोजन मंडळ सन २०२० पर्यंत महाराष्ट्राचे सरासरी शिक्षणमान पदवी शिक्षण हे लक्ष्य निर्धारित करण्यास सज्ज झालं आहे.
 त्यामुळे भविष्यकाळात महाराष्ट्रातला प्रत्येक युवक, युवती पदवीधर असेल. अशा पार्श्वभूमीवर प्रत्येकानं डॉक्टर, इंजीनिअर, प्रशासकीय अधिकारी अशी एकच वाट धरणे योग्य होणार नाही. आपले जीवन विविधांगी आहे. जीवनाच्या विविध गरजा आहेत. जीवन पूर्ण व्हायचं तर समाजाला डॉक्टर, इंजीनिअरपेक्षा अधिक गरज शिक्षक, साहित्यिक, चित्रकार, पत्रकार, अनुवादक, वकील, दुभाषी, सूत्रसंचालक, व्यवस्थापक, संगणक संचालक, गायक वादक, छायाचित्रकार, जाहिरातदार, परिचारक, वक्ता, समाजसेवक, लोकसेवक, सर्वेक्षक, संपादक, उद्योगपती, फॅशन डिझायनर, अभिनेता, संशोधक, व्यावसायिक, कुशल तंत्रज्ञ, प्रयोगशील शेतकरी विक्रमी दुध उत्पादक, निर्यातदार, व्यापारी, वाहन चालक, विक्रेता यांची असते हे। आपण विसरतो. आज कोणतेही क्षेत्र घ्या. तिथे किमान पदवी शिक्षणाची अपेक्षा केली जाते, कारण महाराष्ट्र हा शिक्षणात केरळ नंतरचं अग्रेसर राज्य आहे.

 विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक, स्पर्धा परीक्षा यांशिवाय बी. ए., बी.कॉम., बी.बी.ए., बी.सी.ए. अशा पदव्या धारण करणारे तरुण म्हणजे बेकारीत भर असा समाजात एक गैरसमज पसरला आहे. कला, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, विधी, पत्रकारिता, चित्रकला, चित्रपट, भाषा, साहित्य, संगीत, क्रीडा इ. क्षेत्रात पदवी संपादून जगता येते. चांगलं वेतन कमावता येते. करिअर या क्षेत्रातही करता येते हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. उच्च शिक्षणात उत्तीर्ण होणारे युवक, युवती याच क्षेत्रात मोठ्या संख्येने उत्तीर्ण होतात. ५0 % ते ७०% गुण मिळवणारे बहुसंख्य असतात हे वास्तवही आपण लक्षात ठेवले पाहिजे. जीवनात जागतिकीकरणामुळे जे महत्त्वाचे बदल घडून आले, त्यामुळे भाषेस व भाषेच्या उच्च शिक्षणास असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. भाषा शिकली की फक्त लिपिक (क्लार्क) होता येतं हे चित्र

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१८५