पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/181

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ३२ दशलक्ष मुले परत त्याच वर्गात राहतात म्हणजेच नापास होतात. ३१ दशलक्ष मुले शाळा सोडतात. जी सोडतात ती परत शिक्षणाकडे वळतच नाहीत. अजून शाळेत न जाणाच्या मुली जगात आहेत. कमी वयाची मुले पुढच्या इयत्तेत दाखल केल्याने नापास होण्याचे प्रमाण मोठे आहे. जगातल्या १९६ देशांपैकी केवळ ९१ देशांतच स्त्री-पुरुष शिक्षण प्रमाण समान आहे. भारत त्यात नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ही स्थिती बदलून आपणास एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलणारे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचे असेल तर नवी कौशल्ये आत्मसात करणारे शिक्षण असले पाहिजे.
 लेखन, वाचन व गणित ही जगातल्या सर्व देशातील शिक्षणाची किमान आणि समान उद्दिष्टे राहिली आहेत. पण जगात वाढत्या संगणक वापराने लेखन मागे पडते आहे. अक्षर ओळख मौखिक होऊन लेखनाची जागा टंकन (Typing) घेऊ लागले आहे. शिक्षणातील भाषिक माध्यमही जगभर क्रांती झाली आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा व जागतिक संपर्काची भाषा झाल्याने जपान, जर्मनी, फ्रान्स, चीनसारखे भाषिक क्षेत्रात स्वभाषेस प्राधान्य देणारे देशही प्राथमिक स्तरापासून इंग्रजी शिकविण्याकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. आपल्याकडे मराठी माध्यमांच्या शाळात पालकांचा सेमी इंग्रजीचा आग्रह त्यातूनच आला आहे. आता नवी पिढी सरळ इंग्रजी माध्यमांच्या शाळा पसंत करते आहे. हा बदलता प्रवाह लक्षात घेऊन आपण आपल्या भाषा शिक्षणाचे धोरण व स्वरूप नको का बदलायला? मराठी अभिमान गीत गाणे हा लोकल अस्मितेचा भाग. पण ग्लोबल आव्हाने पेलत संधीवर स्वार व्हायचे असेल तर इंग्रजी आलीच पाहिजे.

 नव्या शिक्षणात सर्जनात्मकता, नवरचना, शोध यांना असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व विषय हे क्रियाशील अंगाने शिकवणे ओघाने आलेच. आता जगभर तोंडी शिकवणे, खडू-फळा, चित्रे-तक्ते या ऐवजी संगणक, इंटरनेट, सीडीज, डीव्हीडीज, मल्टिमिडीया, स्क्रीन, लॅपटॉप, मोबाइल्स, फिल्मस, क्लिप्स या पलीकडे जाऊन आता थ्रीडी क्लास, व्हच्र्युअल क्लास, रोबो टीचर, ऑन लाईन टिचिंग, लर्निंग सार्वत्रिक होत आहे हे लक्षात घेऊन शाळा तंत्र साधनांनी संपन्न केल्याच पाहिजेत. येणारी पिढी उपजत संगणक साक्षर होते आहे. याचे भान ठेवून शिक्षकांनी स्वतः वेळ न दवडता संगणक स्वाक्षर व्हायला हवे. रोजच्या अध्यापनात सीडी, डीव्हीडी, एलसीडी, इंटरनेटचा वापर केलाच पाहिजे तर ते शिक्षण सर्जनात्मक, क्रियाशील, रंजक, आकलनक्षम होईल.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१८०