पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणताही दोष नसताना अनन्वित छळ, उपेक्षा, उपहास, अमान्यता व प्रसंगी हत्या इ. अघोरी उपायांना बळी जावे लागते. त्यामुळे अशा मुलांच्या व मातांच्या संरक्षणासाठी ‘बालहत्या प्रतिबंधक कायदा' अस्तित्वात आला. यातून ‘बाल हत्या प्रतिबंधक गृहांची' सुरुवात झाली. महाराष्ट्रातील असे पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा फुले यांनी इ.स. १८६३ मध्ये पुण्यात सुरू केले.

 विवाहपूर्व संबंधातून निर्माण होणारी संतती भ्रूणहत्येच्या पापापासून वाचण्यासाठी किंवा स्वतः जन्माला घातलेल्या जिवाचे संगोपन करण्याची तीव्र इच्छा असूनही केवळ समाजभय, समाजमान्यतेच्या पारंपरिक व बुरसटलेल्या कल्पना इत्यादींमुळे ती टाकून अथवा सोडून दिली जाते. अनैतिक संबंधातून जन्माला येणारी, अनौरस मानली जाणारी अर्भके देवळे, बागा, बालकाश्रम, पाणंद, उकिरडे इतकेच काय, पण सार्वजनिक संडासातही टाकली जातात. पोलिसांना वर्दी मिळाली की ती न्यायव्यवस्थेमार्फत अनाथाश्रम, बालकाश्रम, अर्भकालय, बालसदन, अभिरक्षणगृह आदी ठिकाणी संगोपन व संरक्षणार्थ ठेवली जातात. विवाहपूर्व संबंधातून जन्मलेल्या संततीची समस्या गर्भधारणेच्या क्षणापासूनच सुरू होत असते. विवाहपूर्व शरीरसंबंध हे कामेच्छेच्या पहिल्या तीव्र ओढीतून अत्यंत उत्कटतेने निर्माण होत असले, तरी या संबंधांना समाजमान्यता नसल्याने हे संबंध विलक्षण दबावात येत असतात. अशा दबावपूर्ण वातावरणात आलेल्या संबंधातून निर्माण होणाच्या गर्भाची वाढ चोरून, लपवून होत असल्याने गर्भाच्या वाढीवर त्याचे प्रतिकूल परिणाम होत असतात. अशी गर्भधारणा झाली की मग समाजभयाने तो गर्भ पाडण्याचे, सर्व ते उपाय केले जातात. शहरात डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळी औषधं, इंजेक्शन्स घेऊन असे गर्भ पाडण्याचा प्रयत्न केला जातो. पहिल्या दोनतीन महिन्यांतच गर्भपात शक्य असतो. क्युरेटिन करून घेण्याचा काळ गेल्यावर पुढे पाच ते सात महिन्याच्या कालखंडात काही उपाय करणे अशक्य व धोक्याचे असते. सात ते नऊ महिन्याच्या काळात कृत्रिम उपचाराने प्रसूती करून विवाहपूर्व संबंधातील संततीस जन्म दिला जातो. अशा संततींच्या संगोपन व संरक्षणाच्या चिंतेतून ही अनौरस अर्भक टाकून दिली जातात. ग्रामीण भागात गावठी औषधे, झाडपाल्याचा रस इ. घेऊन गर्भपाताचे उपाय केले जातात. सर्व अघोरी उपायांनीही जेव्हा गर्भपात होत नाही तेव्हा अनिच्छेने, दबावात वाढलेल्या गर्भातून निर्माण होणारी संतती ब-याचदा असाधारण (अँबनॉर्मल) असते. शारीरिक व मानसिक आघातांमुळे संततीची वाढ जन्मपूर्व व जन्मोत्तर अशा दोन्ही स्थितीत कृत्रिमपणे होत असते.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१७