पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भविष्यलक्ष्यी स्त्री शिक्षण : जग आणि आपण

 मुलींचे शिक्षण हे गेल्या शतकात जगभर गतीने विकसित झाले. काही वर्षांपूर्वी मी प्राचार्य झालो होतो. मला कला, विज्ञान, वाणिज्य शाखांबरोबर शिक्षणशास्त्र शाखाही पहावी लागायची. आम्ही बी.ए.बी.एड्., एम्. फिल. असे शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवत असू. या नव्या जबाबदारीमुळे मी शिक्षणविषयक अनेक ग्रंथ, अहवाल त्या वेळी वाचत असे. मी प्राचार्य झालेल्याच वर्षी म्हणजे सन २00५ ला इंग्लंडने मुलींच्या शिक्षणाविषयी एक अहवाल प्रकाशित केलेला माझ्या वाचनात आला होता. मी तो त्यावेळी मनापासून वाचला होता. त्याचे कारण माझ्या कॉलेजमध्ये विद्यार्थी व शिक्षक अशा दोन्ही स्तरावर ५0% प्रमाण मुली व महिलांचे होते. इंग्लंडच्या सरकारच्या एका खात्याचं नावच मुळी ‘आंतरराष्ट्रीय विकास विभाग' आहे. त्या विभागामार्फत त्यावर्षी जो एक अहवाल प्रकाशित करण्यात आला होता त्याचे शीर्षक होते, 'Girls Education : Towards a better Future for all' त्या शीर्षकाने मला प्रथम आकर्षित केले होते. साच्या जगाच्या प्रगती व भविष्याचे मूळ मुलींच्या शिक्षणात आहे हे त्या अहवालात अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने ठसवण्यात आले होते. तो अहवाल नव्या एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे म्हणून जागतिक बांधिलकीच्या भावनेने तयार करण्यात आला होता. तीस पानी ती छोटी, रंगीत, सचित्र पुस्तिका म्हणजे मुलींच्या शिक्षणावरील श्वेत पत्रिका (White Paper) होती.

 तिची सुरुवातच मुळी एक छान वाक्याने झाली होती. "To be educated means ... I will not only be able to help myself but

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१७४