पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/174

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यात त्यांनी जात जाणिवांचे रूपांतर जातीय अहंतेत होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून तरुण लेखकांना यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तद्वतच नुकत्याच संपन्न झालेल्या तिस-या सम्यक साहित्य संमेलन २०१२ च्या अध्यक्षपदावरून नाटककार जयंत पवार यांचे विचारही महत्त्वाचे वाटतात. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, ‘नव्या समाजरचनेतील नवी वर्ग-वर्णव्यवस्था नव्या पिढीला समजावून सांगावी लागेल. धर्माच्या नावाने चालवलेली अस्मितेची व मनःशांतीची नौटंकी निव्वळ मनोरंजन आहे हे सप्रमाण दाखवावे लागेल. अर्थनियंत्रणातून संपूर्ण मानवी जीवनावर नियंत्रण करू पाहणाच्या पैशाचे चलनी महत्त्व आणि विचारांचेही विनियमन होऊ शकते हेही दाखविणे जरुरी आहे. दूरसंचार आणि माध्यम क्रांतीतून बनत असलेल्या जागतिक खेड्यात देश, धर्म, जात, प्रांत यांच्या सीमारेषा सहज ओलांडता येतील, प्रसंगी पुसतादेखील येतील.' हे मला अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांशी जोडणारं वाटतं. (खरं तर अँड. प्रकाश आंबेडकरांचे विचार वरील दोन साहित्यिकांच्या पूर्व विचारांचे समर्थन होय.)
 उद्याचा भारत हा जात, धर्मनिरपेक्ष राहणार याच्या पाऊलखुणा आता घरोघरी उमटत आहेत. मोठ्या प्रमाणांवर होणारे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह, आडनाव लिहिण्याचे टाळणारी नवी पिढी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत जात धर्माचे उच्चाटन करत माणूसकेंद्री समाज घडवत आहे. माझी मुलं, माझे विद्यार्थी जेव्हा असे विवाह करतात तेव्हा मी जो विचार सांगितला, आचरला तो काही वा-यावर उडून गेला नाही याचं समाधान या उत्तरायुष्यात मला अधिक आश्वासक नि आशादायी वाटतं. उद्याचा भारत जात, धर्मनिरपेक्षच होणार याची मला खात्री पटली आहे. राजकारणी मतांसाठी कितीही उपद्व्याप करत राहोत, येणारी पिढी त्यांना आपल्या कृती, व्यवहार, आचरणाने उत्तर देत नवा समाज घडवत राहणार आहे.

■■





एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१७३