पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व दुर्बलांना विकासाची संधी दिली. ते देताना ते कोणत्या देशाचे पूर्व नागरिक होते हे गौण मानून नागरिकत्व धारण करणा-यांसाठी समान दर्जा व संधीचे धोरण अंगीकारले. युरोपमधील अनेक देशांत सामाजिक सुरक्षा योजनांद्वारे (Social Security System) समानता आणण्याचे प्रयत्न अव्याहत सुरू आहेत.
 भारतासारख्या देशात प्रश्नांचा निरास होत नाही. त्याचे कारण आपण धोरण व्यापक करत नाही. एक काळ असा होता की, आपल्या देशात दलितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आपला ऐरणीवरचा प्रश्न होता. जागतिकीकरणाच्या परिणामामुळे समाजात विविध प्रकारच्या विषमतेत वाढच झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जातीय विषमता तीव्र होती म्हणून आपण स्वातंत्र्यानंतर आरक्षण धोरण स्वीकारून दलित समाजास मध्य प्रवाहात आणण्याचे धोरण स्वीकारले. गेल्या ६५ वर्षांत दलित समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासाचे जे चित्र पाहतो ते अभिमानास्पद आहे. अंतिम दलित विकासापर्यंत आरक्षणाचे धोरण राहिले पाहिजे, पण ते कालपरत्वे व्यापक होण्याची गरज आहे. त्यासाठी या देशाचे दाखल्यावर जातीची नोंद न करणे ही माझ्या मते प्रतीकात्मक गोष्ट होय. खरं तर धर्माचीही नोंद काढून टाकली पाहिजे. भारतात राहतो व सरकारने ज्याला नागरिकत्व बहाल केले तो भारतीय नागरिक. प्रत्येक नागरिकाला दर्जा व संधीची समानता हे येथून पुढे आपले धोरण हवे. त्यासाठी प्रत्येकाचा विकास निर्देशांक (Development Index) निश्चित केला जावा. तो जात, धर्म यांच्याऐवजी व्यक्तीचे अर्थमान, सामाजिक, आर्थिक स्थिती, स्थावर जंगम संपत्ती, शिक्षण, कुटुंब, घर, भौतिक साधनयुक्तता, आदींच्या आधारावर निश्चित केला जावा आणि त्याआधारे व्यक्तीला सवलत, संधी, आरक्षण आदी सामाजिक सुरक्षांचे फायदे दिले जावेत. आपल्या समाजात दलितांइतकीच दुरवस्था असंघटित, अनाथ, अंध, अपंग, मतिमंद, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी, परित्यक्ता, वृद्ध, मोलकरणी, धरणग्रस्त, शेतमजूर, कामगार, शेतकरी, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे यांची आहे. गेल्या ६५ वर्षांत त्यांना त्यांच्या हक्काचे काय दिले याचा विचार करण्याची वेळ अजून आली नाही का? सामाजिक न्यायाचे ते हक्कदार नाहीत का? अँड. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जात निर्मूलनाचाच विचार व्यक्त केला असल्याने त्याचे उदारपण स्वागत केले पाहिजे.

 अलीकडे ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे मूळ समग्र भाषण माझ्या वाचनात आले.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१७२