पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परंपरागत संस्कार, समाजभय, सामाजिक मान्यता-अमान्यतेचे प्रश्न, व्यक्तीची नाती-गोती, सामाजिक स्थान, इ. मुळे तो क्षणोक्षणी कृत्रिम जीवन जगत असतो. ही गुदमरच खरं तर विवाहबाह्य संबंधांच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे.
 विवाहबाह्य संबंध हे काही पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण नव्हे. ह्या संबंधास अलीकडे मान्यता देण्याचा जो वाढता सामाजिक कल आहे त्यावर मात्र पाश्चात्त्य संस्कृती व साहित्याचा प्रभाव आहे. विवाहबाह्य संबंधांची चर्चा रामायण, महाभारतपूर्व कालापासून आपल्या सामाजिक व साहित्यिक जगतात होत आली आहे. कुंती, कर्ण, शकुंतला, दुष्यन्त, विश्वामित्र, मेनका इ. चरित्रे आठवली तरी याचा आपणास सहज बोध होईल.
 विवाह केंद्र मानले तर त्याच्या परीघात निर्माण होणारे विवाहबाह्य संबंध हे दोन प्रकारचे असतात. (१) विवाहपूर्व संबंध (२) विवाहोत्तर संबंध. आजवर आपण प्रामुख्याने अथवा स्थूल मानाने विवाहबाह्य संबंधांची चर्चा ही विवाहोत्तरकालीन संबंधातच करत आलो आहोत. या प्रश्नाचा साकल्याने व सर्वांगीण विचार होण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या संबंधांची चर्चा कारणे आवश्यकच नाही तर अनिवार्य असते. या दोन्ही संबंधात संततीजन्माचा संबंध असल्याने याचा विचार व्हायला हवा.

 विवाहपूर्व संबंध हे मोठ्या प्रमाणात धोक्याच्या वयात निर्माण होतात. शरीराच्या वाढीबरोबर कामभावना उद्दीपित होतात. या भावनांची भूक भागविण्यासाठी सामाजिक बंधनांच्या भीतीने, चोरीने, गुप्ततेने असे संबंध ठेवले जातात. विवाहपूर्व अशा शरीरसंबंधात सहज आकर्षणामुळे ते निर्माण झाले असल्याने कमालीची एकरसता, निष्ठा, तृप्ती असते. अशा संबंधातून निर्माण झालेला गर्भ हा समज येण्यापूर्वी धारण झाल्याने व अशा गर्भधारणेस सामाजिक मान्यता नसल्याने या प्रकरणी गर्भपाताचा उपाय केला जातो. एकोणिसाव्या शतकात गर्भपात समाज, धर्म, नैतिकता इ. निकषांवर पाप मानला जायचा. ती ‘भ्रूणहत्या' मानली जायची. परिणामी कुटुंबव्यवस्थेवरील कर्मठपणा, पारंपरिकता इ. च्या प्रभावामुळे अनैतिक व असामाजिक संबंधातून निर्माण झालेल्या संततींचे प्रश्न भेडसावू लागले. जीव व त्या जीवास जन्म देणारी कुमारीमाता या दोहोंना समाजात, कुटुंबात स्थान नसल्याने त्यांच्या संगोपन व संरक्षणाच्या गरजेतून आपणाकडे अर्भकालये, अनाथाश्रम, स्वीकारगृहे, इ. संस्था निर्माण झाल्या. यातून एक गोष्ट समाजाच्या लक्षात आली की विवाहबाह्य संबंधातून निर्माण होणाच्या संततीला स्वतःचा

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१६