पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




जिल्हा परिषदेच्या शाळा आणि उपक्रमशीलता

 आज कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाचा जो काही विकास दिसून येतो, त्याची बीजे पूर्वीच्या कोल्हापूर संस्थानाच्या शिक्षणविकास कार्यात आढळतात. सन १८४८ मध्ये संस्थानामार्फत कोल्हापूर, पन्हाळा, आळते व शिरोळ येथे प्राथमिक शाळा सुरू करून हे कार्य प्रारंभ झाले. १८५१ मध्ये कोल्हापुरात पहिल्या इंग्रजी शाळेची सुरुवात झाली. पुढे सन १९६७ मध्ये या शाळेचे पूर्ण हायस्कुलात रूपांतर करण्यात आले. सन १८५४ साली प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रॅहम अहवालावरून इथल्या शिक्षण प्रसार कार्याची माहिती मिळते. राजर्षी शाहू छत्रपती सिंहासनारुढ झाले सन १८९४ साली. तोवर कोल्हापूर संस्थानाच्या कार्यक्षेत्रात प्राथमिक शिक्षणाचा ब-यापैकी विकास झाला होता. सन १८५४ ते १८९४ पर्यंत संस्थानात २२४ प्राथमिक शाळा सुरू झाल्या होत्या. विद्यार्थी संख्या १४,८९९ इतकी होती. राजर्षी शाहू छत्रपतींनी सन १९१७ ला संस्थानासाठी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. ते वर्ष बडोदा संस्थानच्या सक्तीच्या प्राथमिक शिक्षण कायद्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. कारण सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात २५ वर्षे अगोदरच (१८९२) असा कायदा केला होता. भारतातील पहिला सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा म्हणून बडोद्याच्या कायद्याकडे पाहिले जाते. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे जनक म्हणून सयाजीराव गायकवाडांचे ऐतिहासिक महत्त्व आहे. राजर्षी शाहू छत्रपती नुसता कायदा करून थांबले नाहीत. तर त्यांनी अनेक जाती धर्माची वसतिगृहे सुरू करून कोल्हापुरास तत्कालीन बहुजन शिक्षणाची राजधानी म्हणून विकासाचे स्वप्न पाहिले होते. विसाव्या शतकात बरेच

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१६३