पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कापते हे माहीत आहे? म्हणून तर तलवारीच्या धारेस पाणी म्हणतात, बलुतेदार खुरपे, विळा, कोयता, चाकू, कात्री, वस्तरा, फरशीला ‘पाणी लावून' आणतात. पाण्याचा एक अर्थ वीर्य, पुरुषार्थ असाही आहे. म्हणून युद्धात ‘पाणी जोखून' मग व्यूहरचना केली जाते. पाणी असते माणसाचे सत्त्व, स्वत्व, अस्मिता नि अहंही! एखाद्याची सद्दी जिरवायची असेल तर त्याचा ‘पाणउतारा करतात. आत्मा काढून घेतला की माणूस शून्य होऊन जातो. रक्त माणसाच्या धमन्यांतून वाहात राहते म्हणून माणूस काही काही करत राहतो. पण जर का त्याला आगळे, वेगळे, अलौकिक करायचे तर रक्ताचे पाणी' करावे लागते. मिळवायचे तर पाणी, गमवायचे तरी पाणीच लागते. श्राद्धात तर्पण नि जीवनातला मोह सोडायचा तर एखाद्या गोष्टीवर माणसास ‘पाणी सोडावे लागते. जीवनातले रहस्य लक्षात येते ते पाण्यामुळेच. पाणी मुरले की समजायचे काहीतरी घडतंय, बिघडतंय. एखाद्याशी वैर, अबोला धरायचाय... त्याला पाण्यात पाहिले की झाले! ‘अशक्य ते शक्य, करिता सायास' म्हणायची गरज नाही. पाण्याने वाती पाजळल्या की काम फत्ते! जीवनाचे क्षणभंगुरत्व समजून घ्यायचे आहे? पाण्यावरचा बुडबुडा पहा. झाले. भाषा व्यवहारात सर्वत्र पाणीच पाणी दिसते... कारण आपल्या आसमंतातच ते भरलेले असते. अनावर भाव व्यक्त होतात ते डोळ्यांत पाणी आल्यावरच. पाणीदार डोळे म्हणजे सौंदर्याचं वरदानच ना! डोळ्यांतले पाणी आटले की तेच डोळे जुलमी होऊन जातात... ‘डोळे हे जुलमी गडे।' पाणी म्हणजे साधन, हात. चक्रपाणी म्हणजे चक्रधर! शिक्षकाला ‘खडूपाणी अजून कोणी का म्हटले नाही याचे आश्चर्य वाटते. ‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?' ऐकले की लक्षात येतं, लेक सासुराशी जाये! माणसाचे सारे व्यवहार पाण्याशी जोडलेले! शुचिर्भूत झाल्याशिवाय देवाचे न भेटणे, न्हाण येणं नि न्हाणे... सान्यांचा संबंध पाण्याशीच ना? मृत्यूनंतर अंत्येष्टीविधीत मडके फोडल्याशिवाय मृतात्म्यास मोक्ष मिळत नाही? शेवटचे पाणी पितरांना पाजल्याशिवाय आत्मा स्वर्गात जाऊ नाही शकत. ताटाभोवती पाणी फिरवल्याशिवाय किडामुंगीमुक्त अन्न प्राशन नाही करता येत. सूर्याला अर्घ्य दिल्याशिवाय तो प्रसन्न नाही होत. यात तथ्य असो, नसो त्याचा मतीतार्थ एकच - ‘जलहि सर्वस्वम्।

■■





एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१६२