पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/162

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जितके साधे होते, तितकीच साधी गोष्ट आहे. गांधीजींच्या आश्रमातली. एके दिवशी गांधीजी काही लिहीत बसले होते. त्यांना लागली तहान. त्यांनी कुणाला तरी हाक मारली. ‘प्यायला पाणी आण' असे सांगितले. त्या माणसानं फुलपात्र भरून पाणी प्यायले. गांधीजी त्यातले निम्मे पाणी प्यायले. निम्मे पाणी त्यांनी तसेच ठेवले. ते पुन्हा लिहू लागले. त्या माणसाला वाटले, गांधीजींना हवे होते तेवढे पाणी ते प्याले. आता भांडे विसळायला काही हरकत नाही. त्याने ते भांडे उचलले. पाणी खिडकीतून बाहेर फेकून दिले. गांधीजींचे लक्ष त्याच्याकडे गेले. ते एकदम म्हणाले, “अरे, हे काय केलेस?" तो चपापला. आपली काय चूक झाली हे त्याला कळेना. तो नम्रपणे म्हणाला, “अरे, उरलेले पाणी मला प्यायला नको होते, पण तू ते फेकून वाया का घालवलेस? माझ्या डोक्यावरल्या कपड्याच्या घडीवर ते घालता आले नसते का?" अर्धं भांडं पाणीही वाया न घालवायची महात्मा गांधींची धडपड पाहिली की हॉटेलात अनावश्यक ग्लासभर पाणी आणून ठेवणारे वेटर आठवतात अन् आठवतात तोटी नसलेले वाहते नळ.
 हे पाणी निर्माण झाले नि मग जीवसृष्टी अवतरली. मंगळ, चंद्र ग्रहांवर पाणी मिळायचा अवकाश की तिथे प्लॉट पडलेच म्हणून समजा. अन् कदाचित तिथं अमेरिका बोअर मारायलाही कमी करणार नाही, पाणीच पाणी चोहीकडे अशी सुजलाम पृथ्वी आपणास मिळाली. तिचे भूपृष्ठावर पाणी किती अनास्थेने माणसानं संपवले म्हणून सांगू? तळी, विहिरी, नद्या, सरोवरे आटली ती पाणी संपलं म्हणून नाही. पाणी नीट वापरलं नाही म्हणून! बागायती पिके माणसाची चैन झाली आहे. पाटाने पाणीपुरवठा हा अपराध केव्हा ठरणार ? ठिबक सिंचन सक्तीचे का करू नये? दगड टाकून डऽब्ब आवाज आला की शिवाराच्या शिवेपर्यंत पाणी पोहोचल्याचा अंदाज घेणारा बागायती शेतकरी... त्याला एकदा इस्त्रायल दाखवायलाच हवा असे मनापासून वाटत राहते. आता तर या शेतक-याच्या हातात मोटरपंपाचा रिमोट आलाय. त्याला शिवारावर जावं न लागल्याने आता शेजारचे शिवार पाणी पीत राहाते.

 पाणी आपल्या जगण्याशी इतके जोडलेले आहे की आपली भाषा, संस्कृती, लोकव्यवहार सर्वांत ते असं एकरूप झाले आहे की ते वेगळे काढणे अवघड. पाणी जीवनात आले नि तरलता आली. नाद, संगीत, ताल, नृत्य हे सारे पाण्यातून आले हे कितीजण जाणतात? माणसाच्या जीवनात वक्रता, व्यंग, व्यंजोक्ती, तिरकेपणा, कमनीयता हे सारे कलात्मक विश्व माणूस पाण्यापासून शिकला. पाणी धारदार असते. ते ब्लेड-चाकूसारखे

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१६१