पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
विवाहबाह्य संबंध आणि संतती

 विशिष्ट स्त्री व पुरुषांमधील एकाधिकार शरीरसंबंधांना सामाजिक व नैतिक अधिष्ठान, वैधता देण्याच्या गरजेतून विवाहविधी अथवा विवाहसंस्थेचा उदय झाला. विवाह व्यवस्थेपूर्वी स्त्री-पुरुषांमधील शरीरसंबंध हे इतर प्राणीमात्राप्रमाणेच नैसर्गिक होते. मनुष्य जसजसा सामाजिक व सुसंस्कृत होऊ लागला तसतसे नीती, धर्म, सदाचार, इ. कल्पना नि मूल्यांना मग असाधारण महत्त्व प्राप्त झाले. सामाजिक बंधनांच्या सार्वत्रिक अनुपालनातच मानवाचे अंतिम हित सामावलेले आहे, अशी शिकवण तत्कालीन समाजधुरीण, सुधारक, संत, धर्मोपदेशक, पंडित, पुरोहित वर्गाकडून जोपासली गेली. पुढे एका सदुहेतूने निर्माण झालेल्या विवाहसंस्थेवर वडीलधारी, समाजधुरीण व्यक्तींचा प्रभाव नि पगडा इतका पडला की या व्यवस्थेत ज्यांचा विवाह व्हायचा त्यांच्या व्यक्तिगत इच्छा, आवडी, पसंती इ. ना स्थानच उरले नाही. अनिच्छेने, भीडेने, कधी आदरापोटी वैवाहिक सोयरीक होऊ लागली व यातून निर्माण होणारे ताणतणाव, अतृप्ती, सहजसुखाचा अभाव यांच्या प्रतिक्रियेतून विवाहबाह्य संबंध सुरू झाले.

 विवाहबाह्य संबंधांचा विचार करताना एक गोष्ट आपण सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे की ही मूळ समस्या शारीरिक संबंधाची आहे. या संबंधाशी असलेले सामाजिक नाते लक्षात घेऊन आपण त्याची चर्चा सामाजिक परीघात करत असतो. विवाहबाह्य संबंधांचा उगम हा विवाह व्यवस्थेच्या प्रारंभापासूनच झाला आहे. खरे सांगायचे तर विवाहबाह्य संबंध हे विवाह नामक कृत्रिम सामाजिक बंधनाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. मुळात माणसास स्त्री-पुरुषांना प्राण्यांसारखे मुक्त शरीरसुख हवे असते. पण

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१५