पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रवासात तीन आठवडे मी फ्रान्समध्ये होतो. पॅरिसमध्ये १० दिवस व नंतर फ्रान्समध्ये १० दिवस. यानंतर स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, नेदरलँड, बेल्जियम, इंग्लंड, जर्मनी (पूर्व आणि पश्चिम) व्हॅटिकन, लक्झेंबर्ग, इटलीसारखे देश पाहिले. त्यात पर्यावरण संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, नेदरलँडसारखे देश जागरूक व शिस्तप्रिय वाटले. इटली, पूर्व जर्मनी आपल्यासारखे. इंग्लंड, पश्चिम जर्मनी, लक्झेंबर्गही मोठे सजग वाटले.
फ्रान्स
 मे चा पहिला आठवडा संपता-संपता मी पॅरिसमध्ये होतो. सर्वत्र ट्युलिप फुललेले होते. शहर, घर, कार्यालय, कारखाने सर्वत्र निसर्गाचं विलक्षण भान नि प्रेम दिसले. सर्वांत लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे संस्कृती. पॅरिस हे संस्कृतीचं शहर. त्यांच्या संस्कृतीस निसर्गास मोठे स्थान. अठराव्या शतकात तिथे जंगल संरक्षणाचा कायदा होता. एवढ्या एका गोष्टीवरून त्यांच्यातील व आपल्यातील अंतर पुरेसे स्पष्ट होईल. विसाव्या शतकाच्या आरंभी त्यांनी निसर्गरक्षणाचा राष्ट्रीय कायदा केला. तेव्हा त्यांनी कला, इतिहास, विज्ञान, सौंदर्य यावर आधारित देशातील ठिकाणे (नैसर्गिक, स्मारकं, किल्ले, बागा, जंगले, समुद्र, प्राचीन स्थळे इ.) संरक्षित म्हणून जाहीर करून ते थांबले नाहीत तर त्यांच्या मूळ रूपात जतनाचे उपाय शोधले. या दौ-यात मी मेट्झ नावाच्या छोट्या गावी होतो. ते गाव फ्रान्सजर्मन युद्धाचे ठिकाण. तर अख्खे गाव त्यांनी सुरक्षित म्हणून जाहीर केलेले होते. मोटारी आल्या तरी रस्ते दगडीच होते. एकही घर बाहेरून आधुनिक नव्हतं. सांडपाणी वाहून नेणारी व्यवस्था शतकापूर्वीची, जोडीस आधुनिक पण, वृक्षतोडीवर बंदी. डोंगरावर वस्ती करण्यास मज्जाव. नदीत साधा हातही बुडवायची बंदी. एका डेअरीत गेलो होतो तर गाय, म्हशीच्या दुध काढण्यावर नियंत्रण होते. त्या डेअरीनं ठरवून दिलेल्या लीटर्सपेक्षा अधिक लीटर इथं काढायचं नाही. का तर दुधाचे दर, जनावरांचे दूध दोहन प्रमाण, याचे नियोजन होते व ते राष्ट्रीय धोरणाचा भाग होते. तिथे सेंद्रिय शेती (High Nature Value Farming) ला मोठे प्रोत्साहन दिले होते.
स्वित्झर्लंड

 ‘पृथ्वीवरचा स्वर्ग' म्हणून ज्या देशाचं वर्णन केले जाते तो हा देश. जिनिव्हा, इंटरलॅकन, जंगफ्रान्झो, झुरिच, बर्न इ. ठिकाणे मी पाहिली. ‘टॉप ऑफ दि युरोप' असे वर्णन केले जाते त्या जंगफ्रान्झोची भेट म्हणजे साक्षात

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१५३