पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



विनियोजन सामाजिक हितासाठी करण्याची महात्मा गांधींची विश्वस्त कल्पना ही मार्क्सच्या सामाजिक आग्रहाशी जुळणारी आहे.
 ज्ञान, भक्ती, मांगल्य, कर्म, पावित्र्य, प्रेमासारख्या अंतर्मुख गोष्टींचा मार्क्सने नेहमीच विरोध केला. मार्क्सचे सारे विचार हे भौतिकवादी असल्याने आध्यात्मिक गोष्टींना तिथे वाव असणे शक्यच नव्हते. या सर्व आत्मिक बाबींचा मार्क्सने केलेला विरोध अकारण म्हणता येणार नाही. ज्या गोष्टी विशुद्ध वैज्ञानिकतेच्या कसोटीवर पारखता येणार नाहीत, त्या त्याने त्याज्य ठरविल्या, आत्मिकता माणसास भेकड करते, उलटपक्षी विज्ञाननिष्ठा मानवास धैर्य देते. भ्रमात चाचपडण्याचे दिवस संपल्याने आता विज्ञान हाच एकमेव पर्याय आहे. मार्क्सने आपले सारे विचार हे वैज्ञानिक तर्कावर दृढमूल केले आहेत नि म्हणून त्याला त्रिकालाबाधित सत्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
 मानवाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक होऊन साच्या पृथ्वीवर एकसंघ राज्य निर्माण करणाच्या मार्क्सच्या स्वप्नात साम्राज्यवादी सत्ताकांक्षा नव्हती तर अखिल मानवतेच्या कल्याणाचा ध्यास होता, हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे. मार्क्सच्या सामाजिक बदलाचा हा खरा अन्वय जर आपण लक्षात घेतला तर आज जगात दिसून येणारी शस्त्र स्पर्धा, सत्ता स्पर्धा, भांडवलदारांचा अकारण द्वेष, संघटनेच्या नावाखाली चालणारा हैदोस, सत्तांचे नवे केंद्रीकरण इत्यादिस पायबंद बसायला प्रत्यवाय असू नये. मार्क्स म्हणजे हिंसा, मार्क्स म्हणजे रक्तपात, माक्र्स म्हणजे विध्वंस ही समीकरणे विसरून मार्क्सला अपेक्षित सामाजिक बदल घडवून आणण्यास आपण सर्वांनी कटिबद्ध व्हायला हवे. ब-याचदा समाजाची कणव नि करुणा करणारे निष्क्रिय राहतात. आपले प्रबोधन मूठभर त्याच त्या लोकांपुरते नि विचारांपर्यंतच मर्यादित राहते. मार्सला अपेक्षित बदल मूर्त स्वरूपात अपेक्षित होता. कृतीचा स्पर्श नसणारे सारेच विचार वांझोटे असतात, हे उमगल्यावर मग सामाजिक बदलास वेळ लागत नाही.

■■



एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१४