पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाहात असताना १५ ते २० वयोगटातील युवा शिक्षित महिलांची बेकारीची संख्या २४० दशलक्ष असणे आपल्या फसलेल्या स्त्री शिक्षणविषयक नियोजनाचेच फलित म्हणावे लागेल. त्यामुळे स्त्री शिक्षण व रोजगार यात मेळ घालणे काळाची गरज बनली आहे. त्यासाठी दर्जेदार प्रवेश परीक्षांवर लक्ष केंद्रित करणे भाग आहे. शिक्षण व रोजगार शाश्वती यांच्या शक्यतांत वाढ होण्यासाठी रोजगारपूरक अभ्यासक्रम बनवण्यावर भविष्यकाळात भर दिला पाहिजे.

 स्त्री शिक्षण व रोजगार उपलब्धता यांची सांगड घालायची असेल तर लिंगभेद विषयक पूर्वग्रह समाजमानसातून हद्दपार करायला हवेत. त्यासाठी साहित्य, सिनेमा, विचार, व्यवहार अशा चतुर्दिक मार्गानी प्रबोधन करणे व भावजागर घडवून आणणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या व्यावसायिक विकासाच्या (Career Development) अनुषंगाने राष्ट्रीय धोरण व कृतिकार्यक्रम (Action plan) निश्चित करायला हवा. स्त्रियांना संधी देण्याची पुरुष मानसिकता विकसित करणे अधिक महत्त्वाचे. या संदर्भात मी जपानला पाहिले आहे की तिथे स्त्रिया प्रसूतीच्या काळात व मुलांच्या संगोपनासाठी अनेक वर्षे सेवेतून दूर राहतात. (सेवेतील हक्क सुरक्षित ठेवून) घरच्या जबाबदारीतून मुक्त होताच, त्या पुन्हा सेवेत दाखल होतात; पण दरम्यानच्या काळातील संधींना त्या पारख्या समजल्या जात नाहीत. म्हणजे वेतनवाढ, पदोन्नतीस त्यांना पात्र समजण्यात येते. त्यांची सेवा ज्येष्ठता सुरक्षित राहते. तुम्हाला फक्त क्षमता सिद्ध करावी लागते. असे आपल्याकडे झाल्यास स्त्रियांची प्रगती गतिमान होईल. स्त्रियांच्या प्रगतीतील आपल्याकडील मुख्य अडथळा पुरुषी वर्चस्व हे आहे. त्यासाठी काही देशात पदनिहाय स्त्री-पुरुष पदोन्नती आळीपाळीने (Rotation) दिली जाते. आपणाकडे हा प्रघात नाही. तो सुरू करणे आता काळाची गरज व्हायला हवी. शिवाय उच्च पदांवर स्त्री नियुक्ती होण्याने शिक्षण व रोजगार संधींचे वेळोवेळी सर्वेक्षण व मूल्यांकन होणे यातूनही समाजमन जागे राहते. कार्यालय व व्यवसायाच्या ठिकाणी पाळणाघरासारख्या सुविधा आपल्याकडे मूळ धरत नाहीत. त्यांचा दर्जा वाढविणे व स्त्रियांनी पाशातून मुक्त होणे आवश्यक आहे. याचा अर्थ स्पष्ट करतो अन्यथा गैरसमज संभवेल. युरोपादी प्रगत देशात मूल जन्माला घातले जाते, ते विचारपूर्वक व नियोजनबद्ध पद्धतीने. म्हणजे त्याला स्वतंत्र खोली, सुविधा देण्याची शक्यता आजमावून. शिवाय पाच वर्षे त्याच्या वाढी-विकासाचे नियोजन करून. या काळात आई-वडील आळीपाळीने मुलास वेळ देतात. शिवाय मूल जन्मले की ते स्वतंत्र वाढेल याची काळजी

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१४५