पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुंतागुंतीचे, व्यापक, बहुआयामी आहे. या जगात त्यांनी जगायचे, झगडायचे तर त्यांच्यात नवी कौशल्ये द्या. त्यांना मार्क मिळवण्यापेक्षा कसे शिकायचे ते कौशल्य द्या. कारण काही देऊन कधीच माणसात पुरत नसते, दिलेले उरतही नाही; टिकते ते फक्त मिळवलेले. त्यांना स्थूल नका बनवू. ‘सूक्ष्म ते आचरावे, नवे ते शोधावे' तर ती तरतील. त्यांच्या सेकंदाचे हजारो भाग पडतात, हे लक्षात असू द्या. तुम्ही ‘सुशेगाद' होता (खा, प्या, मजा करा.) ‘त्यांना रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' लक्षात घेऊन वेळ पाळणे, वेळेवर काम करणे, वेळेचे नियोजन करणे, वेळेचा सदुपयोग करणे इ. कौशल्य शिकवा. लोळायची सवय नको. लोळतो तो लुळा पडतो हे त्याला समजवा. नको तशी पैशाची उधळपट्टी पण नको. सन २०१० नंतर पालकांच्या हाती आलेल्या गरजेपेक्षा अधिक पगाराने, मिळकतीने पाल्यांना आपण गर्भश्रीमंत आहोत असा भ्रम होतोय. त्यांना सांगा, ही सूज आहे, फुगवटा आहे, पूर ओसरणार आहे. झरा तो आपला. पाझर राखायला शिकवा. सोन्याचं अंडे देणारी कोंबडी कापायची नसते. संयमाचं अंडं घेत राहायचा, थेंबाचा संस्कार समुद्र निर्माण करतो, हे बजावा. लव्हाळे बनवा, तुमच्या मुलांचा महावृक्ष नको. समायोजन दीर्घजीवी ठरते हे सांगा. वाचनाचे संस्कार, संस्कृती द्या. गोष्टी, कादंबरी प्रवासवर्णनं, आत्मकथा, कविता, चित्रे, माणसे, इंटरनेट वाचायला शिकवा. वेगळे वागण्यापेक्षा वेगळेपणाने कृती करायला शिकवा. पूर्वसंचिताचा सदुपयोग करण्याचा विवेक द्या. विधिनिषेधाचे अंतर कळू द्या त्यांना. हे जग सकारात्मक, रचनात्मक, विधायक आहे यावरचा त्यांचा विश्वास दृढमूल करा. हिंसा दुबळी, अहिंसा समर्थ हे ठसवा. ओरबडायचे नसते. निर्माण करायचे असते हे सांगा. सुदैवाने तुमची मुलं समृद्ध काळात जन्मलीत, त्यांना शहाणपणा द्या.

■■







एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१४२