पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जन्माचे निमित्त असतो, जन्मतःच ते स्वतःचे जग, जीवन, विश्व, दैव काय म्हणाल ते घेऊन जन्मतात. तुमचे काम माळ्याचे असते. खतपाणी घाला, तण काढा, अनावश्यक फादी छाटा, कलम करा पण फुले, फळे त्याची असतात हे विसरू नका. मुले ही मुले असतात, माणसे असतात. त्यांना तुमच्या दूरनियंत्रकाचं यंत्र नका बनवू. मंत्र द्या पण तंत्र त्यांचे त्यांना विकसित करू द्या. जगायचे, भोगायचे त्यांनी, ती भूमिका तुम्ही नका बजावू. अनुभवातून, धक्क्यातून, अपघातातून जे शिक्षण मिळते ते स्मशानशांत घरात नाही. त्यांच्यासाठी सेफ पॅसेज नको, सुवेज कालवा द्या त्यांना. त्यांना कळू द्या गती, खाचखळगे, वळणे, थबकणे, सारे काही असते. प्रवास त्यांचा त्यांना करू द्या. स्टेअरिंग तुमच्या हाती नको, पण गतीचं भान व धोके समजवा. त्यांच्याशी सर्व विषयांवर प्रसंग, वय, पाहून बोलत रहा. सांगा नि सोडा. लगेच उगवले, उमगले पाहिजे असा अट्टाहास नको. पीक यायला वेळ लागतो. शेतक-याचा संयम, कष्टसातत्य अंगी बाणा. एकाला एक, दुस-याला दुसरे असा आपपर भेद नको. मुलगा, मुलगी भेद नको. भेद असतोच पण भेदाभेद नको.
 मुलांचे एकटेपण, निराशा, भय, पराजयाच्या वेळी त्यांना हात द्या, त्यांच्या पाठीशी रहा. तीच एक खरी वेळ असते पालकत्व पेलण्याची, निभावायची नि त्यांचे व्हायची. ढग येतात नि जातात... निरभ्र आकाशाचं आश्वासन त्यांना द्याल तर ती तुमची होतील. त्यांच्या गरजा ओळखायला शिकणारे पालक मुलांना आपले वाटतात. आई-बाबांपेक्षा आजी-आजोबा का प्रिय? नुसते लाड पुरवतात म्हणून? नाही, गरजा ओळखतात म्हणून नाही. एकदा हे समजून घ्या. आपल्या मुलात कोणताही न्यूनगंड निर्माण होणार नाही, हे जसे पहा; तसा तो अहंकारी होणार नाही याची काळजी घ्या. त्यांना चमच्याने नका भरवू. हात, बोटे वळवून घास घ्यायला शिकवा. 'चोच देतो तो चारा देतो' म्हणत त्याला निष्क्रिय नका बनवू. त्यांना आपला हाथ जगन्नाथ'ची शिकवण द्या. टाकीचे घाव सोसू द्या त्यांना. त्यांचं भावविश्व घडवण्यास साहाय्यभूत रहा.
जगण्याची नवी कौशल्ये

 जागतिकीकरणानंतरच्या एकविसाव्या शतकाचे पहिले दशकही मागे पडले. तुमची मुले तंत्रज्ञानयुक्त, अधिकाधिक बहुभाषी, बहुसंस्कृती, बहुदेशी नि बहुउद्देशी काळाचे अपत्य होत. त्यांना उपजतच अष्टावधानी जग लाभलं आहे. ती तंत्र नि मंत्र एकाच वेळी घेऊन जन्मलीत. अध्यात्म नि विज्ञानाच्या द्वंद्वात वाढलेली ही नवी पिढी त्यांचं जग पालकांपेक्षा कितीतरी पटीने नवे,

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१४१