पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असते नि त्यासाठी समाजात धैर्य असण्याच्या आवश्यकतेवर त्याने भर दिला आहे. सनदशीर मार्गाने, शांतीने सामाजिक बदल घडू शकतो यावर मार्क्सचा विश्वास होता. अन्याय, अत्याचाराचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी अन्याय व अत्याचारी, हिंसात्मक मार्गाचा अवलंब करावा असे मार्क्सने कुठेही सांगितले नाही. असे असताना मार्क्सवाद म्हणजे हिंसाचार, रक्तपात असे समीकरण का दृढ व्हावे? याचा जेव्हा आपण विचार करायला लागू तेव्हा मार्क्सवादी विचारसरणीचा गेल्या शतकातील इतिहास आपल्या नजरेसमोर आल्यावाचून राहात नाही. सत्ता, अर्थव्यवस्था, संघटना इ. सर्वच क्षेत्रात मार्क्सच्या नावावर त्याच्या अनुयायांनी जो आततायीपणाचा मार्ग अवलंबिला आहे तोच याला कारणीभूत आहे. गांधीवादाची हत्या ही जशी गांधींचे सच्चे अनुयायीच करत आहेत तसेच मार्क्सवादाबद्दलही म्हणता येईल.

 मार्क्सला अपेक्षित सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी नव्या मनोवृत्तीचा वर्ग आवश्यक होता. प्रस्थापित व्यवस्थेत असा वर्ग मिळणे केवळ दुरापास्त होते. श्रीमंत वर्ग संपत्ती संचयात व भौतिक सुखात गुरफटलेला होता. मध्यमवर्गीय बुद्धिवादाच्या नशेत मस्त होते. उरला फक्त कामकरी वर्ग. तोच मार्क्सचे आशास्थान होता. या कामकरी वर्गास सामाजिक बदलाचा अग्रदूत मानून आपल्या जाहीरनाम्यात माक्र्सने म्हटले होते- "कामक-यांनो! गमावण्यासारखे तुमच्याजवळ काहीच नाही. आहेत फक्त दास्यतेच्या बेड्या आणि मिळवण्यासारखं आहे ते म्हणजे नवे जग!" ‘दुनिया के मजदूरों एक हो!' चा नारा संप नि ताळेबंदीसाठी नसून सामाजिक बदलांसाठी होता याचे विस्मरण आपणास झाले आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कामकरी वर्ग हा विभाजित वर्ग होता. त्याच्या संघटनेची आवश्यकता मार्क्सने केवळ एवढ्याचसाठी अपेक्षिलेली होती की व्यक्तिगत श्रमातून निर्माण होणारी संपत्ती परत व्यक्तिगत हितासाठी वापरली जाते. गेली अनेक शतके समाजात निर्माण होणा-या दास्यतेचे हेच मूळ होते नि म्हणून संघटनेच्या द्वारे जर सामाजिक संपत्तीचा ओघ सुरू झाला तर व्यक्तिगत संपत्ती नष्ट होईल व आपोआपच सामूहिक हिताची भावना समाजात जोपासली जाईल, असा बदल हीच त्याला अपेक्षित क्रांती होती. व्यक्तिसुखाची, प्रतिष्ठेची जागा समाजाने घेऊन सर्वांचे समान कल्याण साधणे, व्यक्ती विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हेच मार्क्सचे साध्य होते. भांडवलशाही नष्ट करण्याचा हा मार्ग आदर्शच म्हणावा लागेल. मार्क्सने भांडवलदार व भांडवलशाही या दोहोंचा जो विरोध केला आहे तो केवळ त्याच्या मुळाशी असलेल्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे. व्यक्तिगत धनसंचयाचे

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१३