पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/138

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शाहरूख, सचिन, युवी, माही कळतात नि अण्णा, बाबा, मंत्री, संत्री, गुंड, बदमाश, प्रिन्स, आरुषी सारं न सांगता कळू लागते. त्याचे अनौपचारिक शिक्षण न देता त्याला मिळू लागते व तो मिळवतोही. जोडीला मोबाईल, संगणक, व्हिडिओ गेम असतात. ही मुले माणसांपेक्षा यंत्रांच्या सान्निध्यात अधिक असतात. पालकांनाही ती आपल्या अंगाखांद्यावर खेळावीत असे वाटत नाही. पालक मुलांशीपण औपचारिक Hay, Hellow संवादात सुख मानतात. बेबी सिटर नेमला की त्यांचे काम झाले. मुला-मुलीच्या फ्लाईंग किसवर त्यांचा दिवस निघतो. पूर्वी पालक मुलांच्या तोंडात मधाचे निप्पल देऊन रिकामे व्हायचे. आता ते टी.व्ही.समोर मुलांना ठेवून बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेण्यात धन्यता मानतात. अगोदर आपली सुटका व्हावी म्हणून त्याला टी.व्ही. संगणकासमोर बसवायचे नि नंतर तो उठत नाही म्हणून तक्रार करत राहायचे. मुलं टी.व्ही, संगणक, व्हिडिओपासून तुटायची तर पालकांनी संवाद, सहवास, मैत्रीसाठी वेळ काढायला हवा. गप्पा, गोष्टी, गाणी, गुणगुणणे त्यांना यायला हवे. नाच, नक्कल माहीत हवी. नख-यापेक्षा खन्या गोष्टीत मुलांना रमवायला हवे. हे घडत नसल्याने ती मुले हट्टी, किरकिरी, उद्धट, अभ्यास न करणारी निपजतात असे आपण म्हणत राहतो. खरे तर ती निष्पाप म्हणून जन्मतात. आपण त्यांना पाजत नाही तर लळा, जिव्हाळा, उमाळा येणार कोठून? ती तशी निपजत नसतात, आपण त्यांना तसे घडवतो हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. घरोघरी मुले रिबोट नि मुली बार्बिया डॉल हे आपोआप होत नाहीत. तुम्ही त्यांच्या आसपास जी सृष्टी निर्माण करता, दाखवता तेच त्यांचं भावविश्व, जग बनते. आजची मुले भाव, कल्पना, संस्कार, संस्कृती साच्या अंगांनी पाश्चात्य, जागतिक होतात. यात मुलांचा दोष नाही. पालक दिक्भ्रमित (Confuse) आहेत. त्यांना एकाचवेळी पूर्वही हवी नि पश्चिमही. मुलांना मात्र हवी फक्त पश्चिम. हे चित्र शहरं, महानगरे यात दिसत असले तरी गाव, पाडे, वस्ती इथंही बदलाचे, विकासाचे वारे वाहू लागले आहेत. इथे नसेल सोसाट्याचा वारा पण तिथे झुळझूळ, झुंजूमुंजू नक्कीच आहे.
माझे ते माझे, तुझेपण माझेच

 आजची मुले जन्मतःच जगाचे स्वामी होऊ पाहात आहेत. पालकांनी नकळत त्यांच्यापुढे ठेवलेल्या व्यक्तिवाद, आत्मकेंद्रितता, बंद कप्प्यांचं जीवन इ. त्याची कारणं होत. मुलं खेळताना पाहा... मूल आपले खेळणे घट्ट पोटाशी धरून वा मागे लपवून दुस-या मुला-भावाचे खेळणे हिरावू पाहते.

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१३७