पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झालर मोठी आहे हे लक्षात घ्यायला हवे. यातून शहर व खेडे यातील अंतर झपाट्याने कमी होते याचीपण आपण नोंद घ्यायला हवी.
जागतिकीकरणानंतरची भारतीय कुटुंबे
 कुटुंब हे विवाह संस्थेचे अपत्य असतं. विवाहपद्धती या समाज बदलामुळे नवे रूप घेत असतात. त्या नव्या रूपात शिक्षणाचा जसा वाटा असतो तसा एकविसाव्या शतकात दृक्-श्राव्य माध्यमे, वृत्तपत्रे, संपर्क साधने इ. चाही तितकाच प्रभाव असतो. जागतिकीकरणानंतर कुटुंबाचे आकार, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, शिक्षणमान, जीवनमान, मिळवत्या व्यक्तींची संख्या, कुटुंबाची भौतिक समृद्धी यात मोठे अंतर आले. कुटुंबात जन्मदर कमी होत गेला. स्त्रीमान घटलं तरी स्त्रीचा मान वाढला. कुटुंबातील नातेसंबंध नव्या आर्थिकीकरणात औपचारिक होत गेले. कुटुंबात जातीय, धार्मिक आस्था अस्मितेच्या भ्रामक कल्पनेमुळे बळावल्या. पूर्व व पश्चिम संस्कृतीच्या परस्परविरुद्ध आकर्षणामुळे समाज व कुटुंबातील विसंगती वाढत गेली. दुहेरी व्यक्तिमत्त्वांचा विकास झाला. 'मी नि माझं' भावना प्रबळ झाली. स्वार्थ श्रेष्ठ झाला. दुस-यासाठी करणे मागे पडले. सण, विवाह, मृत्यू इ. प्रसंगीचे जनव्यवहार व जनरीत उपचार बनले. या सर्वांमुळे कुटुंब सौख्य, आपलेपणा, आत्मीयता, ओढ, प्रेम, जिवाला जीव देणे कमी झाले, घरातील ज्येष्ठांचा मान कमी होऊन आर्थिक सत्ता ज्याच्या हाती वा संपत्तीच्या किल्ल्या ज्यांच्याकडे तो कुटुंबप्रमुख बनला. वय, मान, श्रेष्ठत्व हे ‘बळी तो कान पिळी'वर अवलंबून राहिले.
 वाढतं विवाह वय, अपत्य जन्मातील दिरंगाई, अपत्यसंख्येचे नियंत्रण होत ते एकावर येणे, नवरा-बायको दोघांचे मिळवणे, मुलीचे वाढते शिक्षणमान व तिचे मिळवतेपण, कुटुंबात आई-वडील व मुले असे त्रिकोणात्मक संबंधी विश्व, नातेवाइकांची कुटुंबे औपचारिक होणे, मुलांचे वाढते लाड इ. अनेक कारणांमुळे खेडी असो वा शहरे कुटुंबाचे एकारलेपण वाढते आहे. त्यात मुले एकतर अतिलक्षकेंद्री अथवा उपेक्षित राहात आहेत. मुलांचे कुटुंबातील स्थान हे आईवडिलांच्या स्वप्नांचे हकमी ताबेदार असे होत आहे. या नव्या कुटुंबात मुलांचं स्वतंत्र अस्तित्व विसर्जित होणे, हा चिंता नि चिंतनाचा विषय ठरू पाहतो आहे. घर भौतिकांनी भरलेले पण वेळ, सहवास, संवादशून्य अशी स्थिती मुलांच्या मुळावर उठत आहे.
आजचे पालक

 जागतिकीकरणानंतरच्या काळातील पालक किमान साक्षर आहेत. शहर

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१३४