पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पोषाख, फॅशन एक होणं (जीन्स, टी शर्ट, बर्म्युडा इ.) यातून एक नवी सपाट व एकसुरी जीवनशैली, कुटुंब पद्धती, समाजरचना उदयाला येते. ती सर्वत्र सारखी असते. समाजात शिक्षण, नोकरी व्यापार इ. च्या निमित्तानं विदेशी माणसं आपल्या देशात येणं व आपण तिथं जाणं सहज घडतं, ते वारंवार घडत राहतं व त्यातून एक जागतिक समाज व संस्कृती निर्माण होते त्यालाच आपण Flat World, WorldVillage म्हणू लागलो.
जागतिकीकरणाचा भारतावरील परिणाम
 भारत हा सर्वसाधारणपणे धर्मश्रद्धा व कर्मकांडावर विश्वास ठेवणारा देश आहे. जागतिकीकरणामुळे त्याची आर्थिक स्थिती बदलली व तो भौतिक सुखाकडे वळला. इथल्या समाजजीवनात पूर्वी निम्न वर्ग, मध्यमवर्ग व उच्च वर्ग असे तीन स्तर होते. जागतिकीकरणाने त्याचे रूपांतर द्विस्तरीय समाजात केले. अमाप वेतनवाढीमुळे नोकरदार मध्यमवर्ग हा उच्चवर्गात गेला. निम्न वर्गात दारिद्रयरेषेखालील कुटुंबे, शेतमजूर, असंघटित रोजंदार, तृतीय, चतुर्थस्तरीय नोकरदार, झोपडपट्टीतील रहिवासी, भटके - विमुक्त इ. वर्ग राहिला. श्रीमंत गर्भश्रीमंत झाले. मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग व नवश्रीमंत वर्ग बनला. गरीब दरिद्री झाले असे असले, तरी भारताचे एकंदर जीवनमान मात्र उंचावत गेले. विषमतेची दरी मात्र रुंदावत गेली हे खरे.
 समाजमनावरील माध्यम, तंत्रज्ञान, शिक्षण यांचा प्रभाव वाढला. घरोघरी भौतिक सुविधा आल्या. रेडिओची जागा टेलिव्हिजनने फोनची जागा मोबाईलने तर सायकलची जागा दुचाकी, चारचाकी स्वयंचलित वाहनांनी घेतली. गॅस, मिक्सर, कॉट, खुर्ची इ. घरोघरी आले. वीज, पाणी, रस्ते दारी आले. शिक्षण सार्वत्रिक झालं. दळणवळण सोपं झालं. खेड्यातून शहराकडे जाण्याचा ओघ वाढला. त्याचं कारण नागरी जीवनाचं आकर्षण, रोजगार संधी असणं असलं तरी त्याच्या मुळाशी शेती किफायतशीर न राहणे, ग्रामीण भागात रोजगार संधी उपलब्ध नसणे हे जसे आहे, तसे श्रमिक कार्याविषयी समाजातील अप्रतिष्ठा, रोजगारापेक्षा वेतनावरचा विश्वास हीदेखील त्याची काही कारणे होत.

 यामुळे विभक्त कुटुंबाचा प्रसार, घरोघरी मिळवत्या व्यक्ती संख्येत वाढ, उत्पन्न वाढ, गरजा वाढ, रोज उंचावत जाणारं शिक्षण व जीवनमान, भौतिक समृद्धीची जीवघेणी स्पर्धा, व्यक्ती भान, स्वातंत्र्य, स्वाभिमानास महत्त्व इत्यादीमुळे समाज रोज विचार, व्यवहारांनी पाश्चात्त्य नसला तरी आधुनिक होतो आहे. या आधुनिकतेस बौद्धिक स्तरापेक्षा भौतिक सुखाची

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१३३