पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जागतिकीकरण, पालक आणि मुलांचे बदलते भावविश्व

जागतिकीकरण

 जागतिकीकरण ही अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट आहे. तिची सुरुवात व्यापार, उद्योग, अर्थ इत्यादीमुळे झाली असली तरी तिने मनुष्यसमाजाच्या सर्वांगावर परिणाम केला आहे. ती जग एक होण्याची प्रक्रिया आहे. जग एक व्हायचे तर राष्ट्रे एकमेकांपेक्षा वेगळी, स्वतंत्र असण्याचा मूळ पाया आहे, त्या राष्ट्राचा भूप्रदेश, हवामान, भाषा, संस्कृती वेगळी असणं. जागतिकीकरणाचा सर्वांत मोठा परिणाम होत असतो तो सांस्कृतिक वैविध्यावर. जागतिकीकरण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जगातली भाषा, व्यापार, चलन, संस्कृती एक होणं. जागतिकीकरणात व्यापार, उद्योग, अर्थसंबंधी धोरणं वैश्विक होतात. ती होत असताना राष्ट्रीय कायदे, कार्यपद्धती, कर प्रणालीचे वैविध्य संपून सर्व ठिकाणी एकसारखे कायदे व कार्यपद्धती निर्माण होते. पद्धती, दर्जाचं प्रमाणीकरण (Standerdization) होतं. त्यामुळे व्यापार, उद्योग व आर्थिक उलाढाल गतिमान होते. कारण मधले राष्ट्रीय अडथळे दूर होतात. त्यामुळे व्यापार आंतरराष्ट्रीय होतो. बहुराष्ट्रीय कंपन्या हा व्यापार करतात. त्यांचे सर्व देशात जाळं असतं. ते आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था व सत्ता निर्माण करतात. उदा. आंतरराष्ट्रीय व्यापार संगठन, आंतरराष्ट्रीय नाणे निधी इ. या सर्वांच्या तेथील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर परिणाम होतो. त्यामुळे सांस्कृतिक वैविध्य लोप पावते व नवी जागतिक संस्कृती उदयाला येते. इंग्रजी भाषा जागतिक संपर्काची व ज्ञानभाषा होणं, अमेरिकन डॉलर्स, युरो इ. चलनाचा अधिकाधिक वापर, एकाच प्रकारच्या मोटारी सर्व देशात दिसणं, खाणं-पिणं एक होणं (मॅकडोनाल्ड, बियर इ.),

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१३२