पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कितीही कठीण असला तरी मुलांना प्रश्नांशी दोन हात केल्याशिवाय प्रत्यवाय असत नाही. अशा समयी पालक, शिक्षक, समाज, शासन म्हणून आपली काही एक जबाबदारी असते. ती अशी की पाठीवर हात ठेवून जगा म्हणावं. पण त्यात 'तुम लढो, हम कपडे संभालेंगे' असा पलायनवाद नको. आपल्या गरजा अनेक असतात. आपण आजचं उद्यावर ढकलू शकतो. मुलांच्या प्रश्नांचं तसं नसतं. त्याला आज नि आता हेच आदर्श उत्तर असतं. गॅब्रियल मिस्ट्रलनेही ही भावना, कल्पना आपल्या एका काव्य रचनेतून आपणापुढे ठेवली आहे. तो म्हणतो -
 “आपणास ब-याच गोष्टींची गरज असली तरी
 आपण थांबू शकतो,
 पण मुलं नाहीत; हीच नेमकी वेळ अशी आहे की
 त्यांची हाडं आज आकारत आहेत.
 रक्त त्यांचं आता कुठं नुकतंच वाहू लागलंय
 आणि समज त्यांची विकसित होऊ लागलीय
 त्यांच्या अनंत गरजांना
 ‘उद्या' हे उत्तर असूच शकत नाही
 कारण
 त्यांचं नाव 'आज' आहे."
 काल, आज आणि उद्या... काळाच्या कोणत्याही स्थितीत मुले मुलेच असतात. त्यांचे प्रश्न कधीच संपत नाहीत. कारण मुलांचे जीवन म्हणजे न संपणाच्या, न सरणाच्या स्वप्नांची साखळी असते. एकदा का तुम्ही तिच्यात गुंतलात की मग सुटका नाही. मुले हा गुंता खरा, पण तो सुटणारा असतो. ही नीरगाठ नव्हे, असेलच तर सूरगाठ असा विश्वास घेऊन तो समाज जगतो तोच प्रज्ञापुत्रांना वाट करून देत असतो. जिथे मुले प्रज्ञापुत्र होतात तो देश साच्या जगाला आपला आज्ञापुत्र करून टाकतो यावर विश्वास ठेवा.

■■




एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१३१