पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सामाजिकदृष्ट्या विशेष असलेले मुलं ही समाजात असतात. अनाथ, निराधार, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुले, वेश्या, देवदासी, कुष्ठरोगी, कुमारीमाता यांची अपत्ये, आपत्तीग्रस्त, हरवलेली, टाकलेली, घरातून पळून आलेली, रस्त्यावरील, बालमजूर, किती प्रकारची मुलं-मुली समाज, कुटुंब, पालक, नाव, ओळख इ. पासून वंचित असतात. टाकलेली नवजात अर्भके त्यांचे जीव, अस्तित्व टिकवणेच आव्हान असते. पालकांच्या कुशीत वाढलेली पण दारिद्र्यास कंटाळून प्रवास, जत्रा, मेळे इ. मध्ये सोडलेली मुले असो वा हरवलेली ... भावनिक पोकळीने ती हादरलेली असतात. कुमारी मातांची.... ज्यांना समाज अनौरस मानतो (का ते कोडंच आहे) त्यांना तर नाव, जात, धर्म, वंश, गोत्र, नातेवाईक काहीच नसते. वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी यांची मुले... आई-वडील असूनही अनाथ असतात. रस्त्यावर राहणारी मुलं... अशाश्वतता इतकी की आयुष्यच स्वतःबरोबर घेऊन फिरत जगत राहतात. निवारा नाही, शिक्षण नाही, उपचार सुविधा नाही, नैसर्गिक धर्म निभावयाचे तर रेल्वे, बसस्थानकावरची सुलभ शौचालयेच आधार. फलाटांवर झोपणे, जगणे, भीक मागत, चो-यामाच्या करत, बूटपॉलिश करत जगणारी ही मुले. बालमजुरांचे जीवन तर उमलण्यापूर्वीच कोमेजून जातं. ना जगण्याची उमेद, ना शिक्षणाची आस.
 या मुलांच्यासाठी अनाथाश्रम, रिमांड होमसारख्या संस्था आहेत. पण संस्थांची स्थिती फारशी आशादायक राहिली नाही. अपवाद आहेत पण सन्माननीय. या मुलांना प्रेम, उबारा, आपलेपणाची प्यास असते. आपले कुणीतरी असावे वाटते. प्रेमाचे दोन शब्दही त्यांना वळवाचा दिलासा देऊन जातात. क्षणिक प्रलोभनांना बळी पडणारी ही मुलं-मुली. शासन, समाजाने यांच्यामागे खरे तर बालक हक्क, मानव अधिकार इ. च्या माध्यमातून सामाजिक न्यायाचं कवचकुंडल निर्माण करायला हवे. पण ज्याच्याकडे हरवण्यासारखं काहीच नसतं, त्यांचे समाजात कोणीच नसतं. नसणेपण घेऊन जगणाच्या मुलांच्या प्रश्नांची जंत्री मोठी आहे. समाज जेव्हा स्वतःपलीकडे पाहायला शिकेल तेव्हाच यांचे दुष्टचक्र संपणार. या विशेष मुलांचे विशेष प्रश्न सोडविण्यासाठी तुमची संवेदना तरल हवी नि हात मदततत्पर. तरच ती सनाथ, स्वावलंबी बनणं शक्य आहे.
समारोप

 जागतिकीकरणाचे अपत्य म्हणून उगवलेल्या एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक सरल्यालाही बराच काळ उलटून गेलाय. आजची मुलांच्या प्रश्नांसंदर्भातील विषम परिस्थिती पाहिली की थकायला होतं. प्राप्त काळ

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१३०