पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विवाह वेळेत होतात, आपण वेळेवर अक्षतेस उपस्थित राहात नाही, मग सामाजिक समारंभ (भाषण, सत्कार, प्रकाशन इ.) उशिरा का? पाहणा वेळेत नाही आला तर समारंभ का नाही सुरू करायचा? वेळेवर येणारे विद्यार्थी अन् उशिरा येणारा पाहुणा यातूनच आपली बेशिस्त नागरी वाटचाल सुरू होत असते.
शिक्षक

 शिक्षक हा बालक व बाल्यकेंद्रित असेल तर बालशिक्षण प्रभावी होते नि परिणामकारकही. परंतु वर्तमान शिक्षणपद्धतीत औपचारिक पूर्ततेस महत्त्व दिले जाते. शिक्षकाचे खरे काम मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास. तो मागे पडून अभ्यासक्रम पूर्ण करणे व परीक्षा घेणे हे त्याचे प्रमुख काम होऊन बसले आहे. तो शिक्षक कमी नि परीक्षक अधिक अशी त्याची स्थिती आहे. शिक्षक मूल्य रुजविणारा, संस्कार देणारा, काळाची पावले ओळखून शिकविणारा, द्रष्टा, सर्जक हवा आहे, याचे भान न राहिल्याने तो केवळ ज्ञानवाहक राहिला, ज्ञाननिर्माता नाही झाला. कोवळ्या वयात मुलांचे सुप्त गुण फुलले तर त्यांचे व्यक्तिमत्त्वही विकसित होते, याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आज ही मुले संगणक, इंटरनेटमध्ये पारंगत आहेत. पण शिक्षक संगणक निरक्षर. ही कालगत विसंगती आहे. त्यामुळे कालसंगत शिक्षण मिळत नाही. शिक्षक निरंतर विद्यार्थी असतो. तो नित्य नवी कौशल्ये आत्मसात करतो, हे गृहीत व्यवहारात न उतरल्याने विद्यार्थी-शिक्षक संवाद, सहप्रवास घडेना झालाय. दैनंदिन शालेय परिपाठात प्रयोग, निर्मिती, कृती, अभिव्यक्ती या गोष्टींना अवसर न राहिल्याने शिक्षण निरस व निरुपयोगी संथा बनून राहिले आहे. ही जागृती पालकात असेल तर शिक्षक कार्यतत्पर राहणार. पालक संघाने शिक्षकांवरील नियंत्रण वाढवले तरच तो समाजास जबाबदार राहील. मुलांची जिज्ञासा दूर करण्यास, त्यांचे कुतूहल समजावून घेऊन त्यांचे समाधान करण्यास ना पालकांना वेळ आहे ना शिक्षकांना अगत्य. यामुळे मुलांचा कोंडमारा नि नवकल्पनांची नाकेबंदी चिंतनीय आहे. वाचन घटते आहे. संस्कार कमी पडत आहे. मार्क आणि गुण यातला शिक्षक व पालकांचा पर्याय चुकल्याने मुलं घोकंपट्टी करणारे 'His/Her Master Voice' होत आहेत. पोपट बनवणारे शिक्षक सारंग जन्माला घालू शकत नसतात. वक्तृत्व, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, संगीत, क्रीडा असा अष्टपैलू. खरे तर सर्वपैलू विकास हे शिक्षणाचे आद्य उद्दिष्ट होय. नेमकी त्याचकडे आपण पाठ फिरवली आहे. भारत महासत्ता व्हायचा तर विद्यार्थी बौद्धिक, भावनिक, मानसिक, शारीरिक, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असला

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१२६